Metro Line 5 : प्रवाशांची प्रतिक्षा संपणार; ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो कधीपर्यंत सुरु होणार? तारीख आली समोर
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Metro Update : ठाणे आणि भिवंडी-कल्याण या शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.यात प्रवाशांना लवकर मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
कल्याण : मुंबईत गेल्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे झपाट्याने विस्तारले आहे. राज्यातील इतर शहरांतही मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. त्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
कल्याण-भिवंडीकरांचे स्वप्न पूर्ण
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिकेवरील पहिला टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. या मार्गिकेमुळे भिवंडी शहराला पहिल्यांदाच मेट्रोची सुविधा मिळणार असून त्यामुळे परिसरातील वाहतूक समस्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मेट्रोचा पहिला टप्पा कसा असेल?
मेट्रो 5 मार्गिका एकूण 24.45 किमी लांबीची असून या संपूर्ण मार्गावर 17 स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 8,416 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने हा प्रकल्प दोन टप्प्यांत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका असा 12.20 किमी लांबीचा मार्ग सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये 7 स्थानकांचा समावेश आहे.
advertisement
पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे जवळपास 97 टक्के पूर्ण झाली आहेत. कापूरबावडी येथील एका खांबाचे काम काही काळ रखडले होते. एका राजकीय नेत्याच्या विरोधामुळे जाहिरात फलक हटवण्यात अडचणी आल्याने हे काम थांबले होते तसेच मेट्रो मार्गिकेच्या आड येणारी एक इमारतही अडथळा ठरत होती. मात्र आता जाहिरात फलक हटवण्यात आला असून सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता राहिलेली कामेही लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.
advertisement
मेट्रो मार्गावर चाचणी फेऱ्या कधी घेतल्या जाणार?
मेट्रोसाठी आवश्यक यांत्रिक आणि विद्युत यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यानंतर सप्टेंबर 2026 पर्यंत मेट्रोची चाचणी सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. कारशेडचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सुरुवातीच्या टप्प्यात मेट्रो गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तात्पुरत्या स्टॅबलिंग मार्गिकांचा वापर करून मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे.
advertisement
मेट्रो 5 साठी कारशेड कशेळी येथे उभारण्यात येणार आहे. ही जागा दलदलीची असल्याने भराव टाकून ती बांधकामयोग्य करावी लागणार आहे. यासाठी सुमारे 6 महिने लागणार असून त्यानंतर कारशेडच्या बांधकामाला सुरुवात होईल. संपूर्ण कारशेड तयार होण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान मेट्रो 5 मार्गिकेसाठी 22 मेट्रो गाड्या खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीला 2,481 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटाअंतर्गत रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि टेलिकॉम यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे तसेच डेपो प्लांट मशिनरी पुरवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:48 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Metro Line 5 : प्रवाशांची प्रतिक्षा संपणार; ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो कधीपर्यंत सुरु होणार? तारीख आली समोर








