अमेरिकन महिलेवर भारतात 10 वर्षात 3 ठिकाणी मानसिक उपचार; कोकणातल्या जंगलात आली कुठून?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रोणापाल येथील जंगलात अमेरिकन महिला ही साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना सापडली होती. त्या महिलेवर गेल्या दहा वर्षात भारतातील गोवा, मुंबई व दिल्ली येथे मानसिक उपचार झाले आहेत.
भरत केसरकर, सिंधुदुर्ग : रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेवर मानसिक उपचार करण्यासाठी रत्नागिरी येथे गुरुवारी रात्री उशिरा हलविण्यात आले. महिलेच्या आधारकार्डवर असलेला पत्ता चुकीचा असल्याने प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. आठ दिवस उलटूनही महिलेचा पती अद्यापही पोलीस पथकाच्या हाती लागला नाही. दरम्यान, अमेरिकेतील प्रसारमाध्यम व समाज माध्यमावर यासंदर्भात बातम्या व व्हिडीओ सातत्याने प्रसारित होत आहेत. अमेरिकन सरकारवर देखील यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी दबाव वाढत आहे. अमेरिकेत सर्वत्र 'धीस वुमन इज ए वॉरीअर्स' या हॅशटॅग खाली तिचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
आठ दिवसांपूर्वी शनिवारी रोणापाल येथील जंगलात अमेरिकन महिला ही साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना सापडली होती. सावंतवाडी, ओरोस, बांबोळी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा तीला पुन्हा ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. गुरुवारी रात्री तीला रत्नागिरी मानसिक रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बांदा पोलिसांनी त्या महिलेकडे दिवसभर चौकशी केली. मात्र तीने तपासात मदत ठरणारी कोणतीही माहिती दिली नाही. आपल्या पतीचे नाव केवळ सतीश असेच असल्याचे सांगत आहे. याव्यतिरिक्त ती काहीही माहिती देत नसल्याने पोलिसांसमोर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
आधारकार्डचा पत्ता 'फेक'
बांदा व सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आठ दिवसांपूर्वी तामिळनाडू येथे तपासासाठी पाठविण्यात आले होते. मात्र महिलेने आधारकार्डवर दिलेला तामिळनाडूचा पत्ता 'फेक' असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तामिळनाडूत गेलेल्या पोलीस पथकाच्या हाती काहीच लागले नाही. बांदा पोलीसात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल झालेल्या पतीला तामिळनाडूत शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
advertisement
अमेरिकन माध्यमांकडून घटनेची दखल
या प्रकरणाची अमेरिकन दुतावासाने गंभीर दखल घेतली आहे. दररोज तपासाची माहिती केंद्रीय गृह विभागाला देणे बंधनकारक आहे. या प्रकरणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने पोलीसांवर दबाव वाढला आहे. अमेरिकेतील प्रसार माध्यमातून घटनेची दखल घेण्यात आली असून सविस्तरपणे व्हिडीओ बातमी मांडण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील समाजमाध्यमावर देखील हॅशटॅग वापरून बातम्या व्हायरल होत आहेत. याप्रकरणी अमेरिकन सरकारने कार्यवाही करण्याची मागणी अमेरिकन जनतेतून होत आहे.
advertisement
'त्या' महिलेवर अमेरिकेतही उपचार
जंगलात सापडलेल्या त्या महिलेवर गेल्या दहा वर्षात भारतातील गोवा, मुंबई व दिल्ली येथे मानसिक उपचार झाले आहेत. त्यापूर्वी देखील तिच्यावर अमेरिकेतील फिलिपीन्स राज्यात मानसिक आजारावर उपचार झाले आहेत. सदरची महिला ही पर्यटक व्हिसावर भारतात आली होती. त्यानंतर तिच्या पारपत्राची मुदत संपली होती. अमेरिकन दुतावासाने तिच्या पारपत्राची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज स्वीकारला आहे. मात्र, ती माहिती देत असलेला तिचा पती सतीश याच्याशी तिची कशी ओळख झाली. तसेच ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जंगलात कशी पोचली हे गूढ मात्र अद्यापही कायम आहे. सदर महिला माहिती देत नसल्याने पोलिसांसमोर तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
'त्या' महिलेचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट
view comments'त्या' अमेरिकन महिलेचे इन्स्टाग्राम अकाउंट होते. भारतात आल्यानंतर तिने आपल्या पतीच्या नावासहित समाज माध्यमावर अकाउंट सुरु केले होते. त्यावर १०० पोस्ट देखील केल्या होत्या. त्यावर तिने भारतातील छायाचित्रे तसेच व्हिडीओ देखील अपलोड केले होते. मात्र घटनेच्या काही दिवस अगोदर समाज माध्यमावरील तिचे हे अकाउंट डिलीट करण्यात आले आहे. पोलीस समाज माध्यमावरून याची माहिती घेत आहेत. ही माहिती मिळाल्यास तिची भारतातील वास्तव्याची सर्व माहिती उघड होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2024 10:46 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
अमेरिकन महिलेवर भारतात 10 वर्षात 3 ठिकाणी मानसिक उपचार; कोकणातल्या जंगलात आली कुठून?


