अंगणात लक्ष वेधून घेईन नक्षीदार मोर, दिवाळीला काढा आकर्षक रांगोळी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीला प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते. आकर्षक मोराची रांगोळी कशी काढायची? इथं पाहा.
कोल्हापूर, 7 नोव्हेंबर : दिवाळी सणाच्या निमित्ताने अंगणात रांगोळी काढायला मुली आणि महिला यांच्यासोबतच बरेच तरुण देखील उत्सुक असतात. यावेळी रांगोळी काढताना नक्षीदार रांगोळी ठिपक्यांची रांगोळी संस्कार भारती अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. त्यातच वेगवेगळ्या नक्षी असणारी रांगोळी काढताना सरावाची गरज पडते. मात्र कमी वेळेत सुंदर अशा नक्षीदार मोराची रांगोळी कशी काढावी, याबाबत कोल्हापूरच्या रांगोळी आर्टिस्ट असलेल्या प्रतीक कांबळे याने सांगितले आहे.
कोल्हापूरकर प्रतीक कांबळे हा रांगोळी कलाकार आहे. तो अतिशय सुंदर फ्रिस्टाईल रांगोळ्या काढतो. यामध्ये संस्कार भारती रांगोळी, स्प्रेड रांगोळी, चाळणीचा वापर करून काढलेली रांगोळी अशा अनेक पद्धतीच्या रांगोळ्या तो काढत असतो. या रांगोळी काढताना वापरलेली रंगसंगती आणि मुक्त पद्धतीने वापरलेली कला यामुळे या सर्व रांगोळ्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतात. दिवाळीनिमित्त अशी सुंदर रांगोळी आपल्याही दारात असावी असे प्रत्येकाला वाटू शकते. त्यामुळेच प्रतिकने सोप्या पद्धतीने अशी सुंदर रांगोळी काढण्याची युक्ती सांगितलेली आहे.
advertisement
अशी काढा मोराची रांगोळी
खरंतर नक्षीदार मोर हे बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो. मात्र असे मोर हे रांगोळीच्या स्वरूपात जमिनीवर काढणे तितकेच अवघड देखील असते. त्यामुळेच आपल्याला शक्य तितक्या प्रकारे आपण मोराची नक्षी काढण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला साधारण वर्तुळाकार पद्धतीने आपल्याला हव्या असणाऱ्या रंगात मोराचे शरीर काढण्यासाठी रांगोळी पसरुन घ्यावी. मोराचा सुंदर असा पिसारा काढण्यासाठी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या रंगांची रांगोळी गोळा करून एका ठिकाणी ठेवावी आणि आपल्या हाताने सारवल्याप्रमाणे एका झटक्यात ती पसरावी. नंतर मोराचे डोळे, चोच आणि शरीराच्या बाजूने हाताने बॉर्डर काढून घ्यावी. त्यानंतर अजूनही जमेल ती नक्षी आपण मोराच्या बाजूने काढू शकतो, असे प्रतिकने सांगितले आहे.
advertisement
दरम्यान, रांगोळी काढणे ही एक कला असून प्रत्येकाला अगदी छान रांगोळी जमेलच असे नाही. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने सोपी आणि सुंदर रांगोळी काढू शकतो, तशा पद्धतीने रांगोळी काढण्याचा आनंद सणउत्सवाच्या काळात लुटायला हवा. अगदी सोप्या पद्धतीनं आपण आकर्षक मोराची रांगोळी काढू शकता.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 07, 2023 6:47 PM IST