पैशांअभावी थांबणार नाहीत उपाचर, रुग्णांच्या मदतीला जिल्हा मदत कक्ष धावणार, कसा करायचा अर्ज?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Health News: आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि गरजू रुग्णांना मदतीसाठी अनेकदा मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पण आता जिल्हा मदत कक्षातच आर्थिक मदत मिळणार आहे.
पुणे: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि गरजू रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे रुग्णांचे उपचार अर्धवट राहतात किंवा सुरूच होत नाहीत. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत मदतीची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. यापूर्वी मदतीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना थेट मंत्रालयात हेलपाटे मारावे लागत होते. पण आता प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मदत कक्षांमुळे ही मदत वेळेवर मिळू लागली आहे.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या जिल्हा परिषद इमारतीच्या तळमजल्यावर, खोली क्रमांक 10 मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत आहे. हा कक्ष कमी उत्पन्न असलेल्या आणि वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या नागरिकांना शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य करतो. यापूर्वी अशा मदतीसाठी नागरिकांना थेट मंत्रालयात जावे लागायचे, त्यामुळे वेळखाऊ प्रक्रिया आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. ही अडचण ओळखून शासनाने निर्णयात बदल करत प्रत्येक जिल्ह्यात हे मदत कक्ष सुरू केले आहेत. ज्यामुळे गरजूंना वेळेत आणि सोप्या पद्धतीने मदत मिळणं शक्य झालं आहे.
advertisement
अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात जिल्हा मदत कक्ष कार्यरत आहेत. या कक्षांमार्फत गरजू रुग्णांना शासकीय मदतीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाते. तसेच, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून अर्ज शासन दरबारी पाठवला जातो. अर्ज सादर करताना संबंधित रुग्णांकडून डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, उपचार खर्चाचा अंदाजपत्रक, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड आणि इतर वैयक्तिक दस्तावेज आवश्यक असतात.
advertisement
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा cmrfpune@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करता येतो. ई-मेलद्वारे अर्ज करणाऱ्यांनी मूळ अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या अधिकृत ई-मेलवर पाठवावीत. तसेच, प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यासाठी रुग्णांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षात भेट द्यावी. अर्ज दाखल झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांत प्राथमिक छाननी पूर्ण केली जाते. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. याबाबतची माहिती कक्ष प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली आहे.
advertisement
सहा महिन्यांत 17 कोटींहून अधिक मदत!
view commentsजानेवारी ते जून 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील 1,785 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 17 कोटी 28 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या निधीतून हृदयरोग, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, कर्करोग, तसेच हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, आणि इतर गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मदतीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार घेणे शक्य झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 26, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
पैशांअभावी थांबणार नाहीत उपाचर, रुग्णांच्या मदतीला जिल्हा मदत कक्ष धावणार, कसा करायचा अर्ज?


