Health Tips: स्मरणशक्ती वाढविते अन् पचन सुधारते, लहान मुलांना सुवर्ण प्राशन अतिशय फायदेशीर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Health Tips: लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण ठरलेल्या काळात दिले जाते. त्यामुळे मुलांना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना आळा घालता येतो.
अमरावती: लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण ठरलेल्या काळात दिले जाते. त्यामुळे मुलांना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना आळा घालता येतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सुवर्ण प्राशन. सुवर्ण प्राशन दिल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे लहान मुलांना सुवर्ण प्राशन हे एका ठरलेल्या काळात दिले जाते. 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हे अतिशय फायदेशीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. सुवर्ण प्राशनबाबत सविस्तर माहिती, अमरावती येथील डॉ. धिरज आंडे यांनी दिली आहे.
सुवर्ण प्राशनबाबत माहिती देताना डॉ. धिरज आंडे सांगतात की, लहान मुलांची स्मरणशक्ती, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राशनचा उपयोग होतो, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी असलेल्या काश्यप सहिंतेमध्ये सुवर्ण प्राशनचा सर्वप्रथम उल्लेख केला आहे. 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांना सुवर्ण प्राशन केले जाते. मुलांना सुवर्ण प्राशन करण्याचे दोन प्रकार आहेत, ते पुढीलप्रमाणे,
advertisement
1. पहिल्या प्रकारात 0 ते 6 महिन्यापर्यंत बाळाला दररोज सकाळी सुवर्ण प्राशन केले जाऊ शकते. त्यात ड्रॉपलेट फॉर्ममध्ये सकाळी 2 थेंब सुवर्ण प्राशन बाळाला दिले जाते.
2. दुसऱ्या प्रकारात 0 ते 16 वर्षांपर्यंत दर महिन्याला पुष्य नक्षत्राच्या दिवशी बाळाला 4 थेंब सुवर्ण प्राशन केले जाते, असे ते सांगतात.
advertisement
सुवर्ण प्राशन करण्याचे फायदे
1. रोग प्रतिकारशक्ती वाढवते
लहान मुलांना अनेकदा वारंवार सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजार होत असतात. काही मुलांची रोग प्रतिकारशक्ती अतिशय कमी असल्याने त्यांना हे आजार वारंवार उद्भवतात. त्यांना सुवर्ण प्राशन केल्यास त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.
2. स्मरणशक्ती वाढविते
0 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. पण, वेळेनुसार ती कमी होऊ शकते. काही मुलांची स्मरणशक्ती तर खूपच कमी असते. त्यामुळे त्यांना अनेक समस्या येतात. सुवर्ण प्राशन केल्यास ही समस्या देखील कमी होऊ शकते.
advertisement
3. पचन सुधारते
अनेक मुलांना पचनाचे विकार असतात. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ खुंटते. सुवर्ण प्राशन केल्यास मुलांची पचन क्रिया देखील सुधारण्यास मदत होते.
4. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते
सुवर्ण प्राशन केल्यास आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे ते सांगतात.
सुवर्ण प्राशनमधील घटक कोणते?
सुवर्ण प्राशनमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध केलेले सोने वापरले जाते. त्याचबरोबर गाईचे तूप सुद्धा यात वापरले जाते. मध आणि इतर काही घटक पर्यायी असतात. जसे ब्राम्हणी, शंखपुष्पी, मांडूकपर्णी या घटकाचा वापर केला जातो. यासर्व घटकातील वेगवेगळे गुणधर्म मिळून सुवर्ण प्राशन तयार होते, असे डॉ. धिरज आंडे सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
July 22, 2025 3:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: स्मरणशक्ती वाढविते अन् पचन सुधारते, लहान मुलांना सुवर्ण प्राशन अतिशय फायदेशीर, Video