National Science Day 2024: या वर्षीच्या विज्ञान दिनाची थीम आणि महत्त्व
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने भारत सरकारकडे मागणी केली होती की, 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जावा.
सध्याच्या काळाला विज्ञानाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातं. आपल्या देशानेसुद्धा विज्ञानाच्या आधारे विविध क्षेत्रात आमूलाग्र प्रगती केली आहे. देशातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञानाचं महत्त्व बिंबवलं जावं यासाठी दरवर्षी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी ‘रामन इफेक्ट’चा शोध लावला होता. रामन इफेक्टसाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. 1986 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता. नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने भारत सरकारकडे मागणी केली होती की, 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जावा.
advertisement
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकणं आणि ती जगासमोर मांडणं हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्देश आहे. या दिनानिमित्त तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केलं जातं. या शिवाय वैज्ञानिक विचार आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेणेकरुन येणाऱ्या पिढ्यांना विज्ञानक्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल आणि ते या क्षेत्रात आपलं भविष्य घडवू शकतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगण्याची संधी देतो.
advertisement
राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम
'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची थीम आहे. ही थीम विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याचं महत्त्व अधोरेखित करते आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देते.
विविध कार्यक्रमांचं आयोजन
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरातील शाळा आणि कॉलेजेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. वैज्ञानिक प्रदर्शनं आणि परिषदा होतात. या शिवाय विज्ञान विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी विज्ञानाशी संबंधित चित्रपट दाखवले जातात. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये वैज्ञानिक कार्यशाळा देखील घेतल्या जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2024 2:42 PM IST










