आता महागडी क्लीनिंग प्रोडक्ट विसरा, फक्त 1 बटाटा वापरा, घर होईल एकदम फर्स्ट क्लास!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
कच्च्या बटाट्याचे अनेक उपयोग घराच्या स्वच्छतेसाठी प्रभावी ठरले आहेत. गंज काढणे, कपडे धुणे, चांदीच्या दागिन्यांची चमक वाढवणे किंवा पांढऱ्या बूटांवरील दाग काढणे, बटाट्याच्या सहाय्याने...
बटाटा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. प्रत्येक घरात तो असतोच आणि तो किती कामाचा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तो फक्त आरोग्यच नाही चांगलं ठेवत, तर घर सुद्धा लख्ख करतो! कच्च्या बटाट्याने आणि त्याच्या सालींनी घर साफ केलं, तर सगळं काही नवं असल्यासारखं चमकू लागतं. कुठलाही डाग असो, तो गायबच होतो!
बटाट्याने करा भांडी आणि लोखंडी वस्तूंचे डाग आणि गंज दूर
कच्च्या बटाट्यामध्ये अनेक नैसर्गिक ऍसिड असतात, जे साफसफाईसाठी खूप मदत करतात. जर भांड्यात काही जळालं, तर त्याचे डाग काढणं म्हणजे मोठी कसरत असते. कितीही घासले तरी ते लवकर निघत नाहीत. अशा वेळी एक कच्चा बटाटा मधून कापा. त्यावर मीठ किंवा बेकिंग सोडा लावा आणि त्या भांड्यावर घासा. काही मिनिटांतच भांडं एकदम स्वच्छ होईल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या भांड्यावर किंवा लोखंडी वस्तूवर गंज लागला असेल, तर बटाट्यावर मीठ किंवा डिश सोप लावून घासा. बटाट्यामध्ये असलेलं ऑक्सॅलिक ऍसिड गंज काढून टाकेल.
advertisement
घराच्या खिडक्या होतील एकदम चकाचक
घराच्या खिडक्या आठवड्यातून एकदा तरी बटाट्याने साफ करायला हव्यात. यामुळे खिडक्यांचे काच एकदम चमकू लागतात. यासाठी अर्धा बटाटा कापा आणि तो काचेवर घासून 5 मिनिटं तसाच ठेवा. त्यानंतर एका सुती कपड्याने खिडकी पुसून घ्या. याच पद्धतीने तुम्ही काचेचं टेबलसुद्धा साफ करू शकता. त्यावरचे डाग लगेच निघून जातात. लाकडी फर्निचरसुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करता येतं.
advertisement
चांदी होईल एकदम नवी
चांदीच्या वस्तू लवकर काळ्या पडतात. पण बटाट्याच्या मदतीने त्या पुन्हा नव्यासारख्या करता येतात. यासाठी बटाट्याची सालं काढा आणि ती पाण्यात उकळा. त्या पाण्यात ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा टाका. पाणी गरम झाल्यावर त्यात चांदीचे दागिने टाका. गॅस बंद करा आणि चांदीचे दागिने त्यात 40 मिनिटं ते 1 तासभर तसेच ठेवा. त्यानंतर ब्रशने ते दागिने स्वच्छ करा.
advertisement
बुटांवरील डाग होतील गायब
पांढरे बूट लवकर खराब होतात आणि त्यावर डाग पडले की ते काढणं खूप कठीण होतं. अशा वेळी एक बटाटा कापा आणि तो पांढऱ्या बुटांवरील डागांवर घासा. थोडा वेळ असं केल्यावर बूट धुवा. बटाट्यामध्ये असलेलं ऍसिड आणि स्टार्च डाग नाहीसा करेल. त्याचप्रमाणे, जर तुमच्याकडे लेदरचे बूट असतील, तर त्यावर बटाटा घासून 5 मिनिटं ठेवा. त्यानंतर कपड्याने बूट पुसून घ्या. लेदरचे बूट पॉलिशशिवाय चमकू लागतील!
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आता महागडी क्लीनिंग प्रोडक्ट विसरा, फक्त 1 बटाटा वापरा, घर होईल एकदम फर्स्ट क्लास!