बाप्पांसाठी बनवा पंचखाद्याचे मोदक, फक्त 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
गणपती बाप्पांना मोदक आवडत असल्याने विविध प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी बनवले जातात. यंदा वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवण्याचा विचार करत असाल तर पंचखाद्याचे मोदक हा उत्तम पर्याय आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: आता लवकरच गणपती बाप्पांचा आगम होणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे बाप्पांच्या आगमनासाठी तयारी जोरात सुरू आहे. बाप्पांना मोदक आवडत असल्याने विविध प्रकारचे मोदक बनवले जातात. यंदा वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवण्याचा विचार करत असाल तर पंचखाद्याचे मोदक हा उत्तम पर्याय आहे. 'ख' हे आद्याक्षर असणाऱ्या 5 पदार्थांपासून अगदी 5 मिनिटांत खास मोदक बनवता येतात. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी याची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
मोदकासाठी लागणारे साहित्य
पंचखाद्याचे मोदक बनवण्यासाठी ख आद्याक्षर असणारे 5 पदार्थ घेतले आहेत. यासाठी खोबऱ्याचा कीस, खारकीचा कीस, खवा, खजूर, खसखस हे पदार्थ आवश्यक आहेत. त्यासोबतच जायफळ, इलायची आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये काजू, बदाम, पिस्ता किंवा तुमच्या आवडतीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता.
advertisement
काय आहे रेसिपी?
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा कीस, खारकेचा कीस, खवा, खजूर, खसखस, इलायची आणि ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तसेच थोडे जायफळ देखील किसून यावर टाकायचं. (हे सर्व पदार्थ तुम्ही तुपामध्ये भाजून देखील घेऊ शकता.) त्यानंतर हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. या सर्व पदार्थांचं एक मिश्रण तयार होईल.
advertisement
मोदक बनवण्यासाठी त्याचा साचा घ्यायचा. हे सगळं सारण त्यामध्ये घालून छान मोदक तयार करायचे. यामध्ये रवा किंवा मैद्याच्या छोट्या पात्यामध्ये देखील हे सारण भरून तुम्ही तळणीचे मोदक तयार करू शकता. हे मोदक चविष्ट आणि पौष्टिकही असतात, असे डॉ. तल्हार सांगतात.
दरम्यान, तुम्हीही यंदा गणपतीचा वेगळा नैवद्य बनवण्याचा विचार करत असाल तर पंचखाद्याचे मोदक आवर्जून बनवू शकता. अत्यंत सोपी आणि फक्त 5 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 27, 2024 12:45 PM IST