चिखलदऱ्याच्या रबडीची चवच न्यारी, चुलीवरच्या चवीला ग्राहकांची मोठी पसंती, बनते कशी? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मेळघाटमधील निसर्ग सौंदर्यात भर घालते ते म्हणजे तेथील प्रसिद्ध असलेली चुलीवरची रबडी. ही रबडी टेस्ट करण्यासाठी दूरदुरून लोकं येथे येतात.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीमधील मेळघाटला वर्षभरात अनेक लोकं भेटी देतात. तेथील निसर्ग सौंदर्य हे भारावून टाकणारे आहे. त्यामुळे तेथील अनेक गावातील नागरिकांनी व्यवसाय सुरू केले आहे. काहींनी सीताफळ रबडी, खवा, तूप आणि बरेच असे व्यवसाय चिखलदरा रोडला बघायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे मेळघाटमधील मडकी येथील चिखलदऱ्याची सुप्रसिद्ध रबडी. मेळघाटमध्ये गवळी बांधव जास्त असल्याने तेथील अनेक लोकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. मडकी येथील गजानन चव्हाण यांनी 2018 मध्ये रबडी बनवायला सुरुवात केली. ते चुलीवरची रबडी बनवत असल्याने त्याची चव ही जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे आता चिखलदऱ्याची रबडी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे.
advertisement
यशवंत रबडी सेंटरचे मालक गजानन चव्हाण यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, सर्वात आधी माझे वडील दूध, तूप, खवा हे बाहेरगावी विकायला घेऊन जात होते. त्यातून काही जास्त नफा मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही विचार केला की, एखादा व्यवसाय आपल्याकडेच सुरू करावा. तेव्हा चिखलदऱ्याला पर्यटक देखील जास्त वाढले होते. तेव्हा आम्ही 2018 मध्ये यशवंत रबडी सेंटर सुरू केले. आम्ही बनवत असलेली रबडी आता चिखलदऱ्याची सुप्रसिद्ध रबडी म्हणून सगळीकडे ओळखली जाते. याचे कारण हेच की, गॅस आणि इलेक्ट्रिक वस्तूच्या काळात आम्ही चुलीवर रबडी बनवतो. त्यामुळेच ही रबडी सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळत राहते.
advertisement
रबडी बनवण्याची प्रोसेस काय?
गजानन सांगतात की, आम्ही सर्वात आधी दूध हे चुलीवर आटवून घेतो. थोड्या प्रमाणात दूध आटले की त्यात साखर टाकून घेतो आणि पुन्हा आटवून घेतो. यात विशेष असे काहीच नाही. फक्त ही रबडी चुलीवर शिजवून घेतल्याने तिला चव येते. म्हणून या रबडीला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. येथे येणारे पर्यटक आमच्याकडुन पार्सल घेऊन जातात. आमच्या येथील पार्सल महाराष्ट्रातच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा गेलेले आहे. एकदा आलेले ग्राहक आमच्याकडे पुन्हा परततात, असेही गजानन सांगतात.
advertisement
चिखलदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांमुळे आमच्या व्यवसायाला चांगली भरारी मिळाली आहे. गावोगावी जाऊन खवा, दूध आणि इतर पदार्थ विकण्यातून मिळणाऱ्या नफ्यात आणि आताच्या नफ्यात फरक सुद्धा दिसून येत आहे. आमच्याकडे खवा, दही, रबडी, कलाकंद, तूप, पनीर हे सर्व प्रॉडक्ट मिळतात. यातून आमची चांगली कमाई होत आहे, असेही गजानन सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
February 27, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
चिखलदऱ्याच्या रबडीची चवच न्यारी, चुलीवरच्या चवीला ग्राहकांची मोठी पसंती, बनते कशी? Video