कोल्हापुरी चिकन मसाला खाल्लात का? पाहा फेमस तांबडा पांढरा रेसिपी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
31 डिसेंबरला बनवा स्पेशल कोल्हापुरी चिकन मसाला आणि तांबडा-पांढरा रस्सा. कोल्हापुरातील फेमस रेसिपी नक्की पाहा.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरी स्पेशल नॉनव्हेज पदार्थ पाहताक्षणी नॉनव्हेज प्रेमी त्याची चव चाखण्यासाठी आतुर होत असतात. कोल्हापूरच्या बाहेर राहणाऱ्या कित्येक नॉनव्हेज प्रेमींच्या बाबतीत तर कोल्हापुरी स्पेशल चिकन-मटण हे नेहमी अग्रक्रमी असते. पण हे चविष्ट पदार्थ तितकेच चविष्ट बनवताना बऱ्याचजणांना त्याची पाककृती माहीत नसते. त्यामुळे कोल्हापुरातील हॉटेल रेडवूडचे मालक आणि एक अनुभवी शेफ असलेल्या जितेंद्र करंबे यांनी स्पेशल कोल्हापुरी चिकन आणि तांबडा-पांढरा रस्सा यांची पाककृती सांगितली आहे.
advertisement
कोल्हापुरी नॉनव्हेज पदार्थांसाठी जो मसाला वापरण्यात येतो तो कोल्हापुरी चिकन किंवा कोल्हापुरी मटण दोन्ही गोष्टी बनवण्यासाठी आपण वापरू शकतो. त्याचबरोबर कोणत्याही पदार्थाला कोल्हापुरी टच येण्यासाठी खास कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी वापरावी लागते, असे जितेंद्र करंबे यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
स्पे. कोल्हापुरी नॉनव्हेज पदार्थांच्या ग्रेव्हीची पाककृती
ओला मसाला बनवण्यासाठी कोथिंबीर, आले, लसूण, पांढरे तीळ, ओले नारळाचे खोबरे, धने, जिरे आदी साहित्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर लवंग, दालचिनी, तमालपत्र, चक्रफुल, काळी मिरी आणि वेलची या खड्या मासाल्यांसोबत कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी, तेल, मीठ हे घटकही वापरले जातात.
कृती :
1) ओला मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला कोथिंबीर, आले, लसूण, पांढरे तीळ, ओले नारळाचे खोबरे, धने आणि जिरे त्याचबरोबर खड्या मसाल्यातील अगदी थोडेसे खडे मसाले घटक घेऊन मिक्सरला थोडेसे पाणी घेऊन अगदी बारीक दरदरीत वाटण करून घ्यावे. हा तयार ओला मसाला चिकन-मटण या दोन्ही पदार्थांसाठी वापरता येतो.
advertisement
2) त्यानंतर हा मसाला भाजून घेण्यासाठी भांड्यामध्ये थोडे तेल घेऊन त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकावा.
3) कांदा खरपूस भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मिक्स मसाला चटणी टाकावी. थोडा वेळ चटणी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला ओला मसाला टाकावा.
4) तेलामध्येच कांदा-लसूण चटणी टाकून साधारण 5 ते 10 मिनिटे भाजून घेतल्यामुळे मिरची आपला रंग आणि तेल सोडू लागते. त्यामुळेच मसाल्याला मस्त कट आणि रंग देखील येऊ लागतो.
advertisement
5) जेव्हा मसाल्याला तेल सुटू लागेल तेव्हा आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे हे समजावे. याच भाजून घेतलेल्या मसाल्यापैकी थोडा मसाला हात तांबड्या रश्यासाठी आणि बाकीचा मसाला हा चिकन किंवा मटणची ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरला जातो.
advertisement
स्पे. कोल्हापुरी चिकन मसाला डिशची पाककृती
थोडेसे तेल, मीठ, चिकन, तयार करून भाजून घेतलेला ओला मसाला, पाणी, कोथिंबीर आदी.
कृती :
1) सुरुवातीला एका बाजूला चिकन स्वच्छ धुऊन घेऊन त्यामध्ये थोडेसे तेल आणि मीठ टाकून मस्त शिजवून घ्यावे.
2) भांड्यात कांदा-लसूण चटणी टाकून भाजून घेतलेला ओला मसाला घ्यावा. ग्रेव्हीला देखील मस्त चिकनची चव येण्यासाठी त्यामध्ये थोडेसे चिकन स्टॉक अर्थात चिकन शिजवलेले पाणी टाकावे.
advertisement
3) त्यानंतर शिजवलेले चिकनचे पीस त्यामध्ये टाकून थोडा दाटपणा येईपर्यंत शिजवून घ्यावे.
4) शेवटी चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरल्यानंतर स्पेशल कोल्हापुरी चिकन मसाला ही डिश खाण्यासाठी तयार होते.
स्पे. कोल्हापुरी तांबड्या रश्श्याची पाककृती?
भाजून घेतलेला ओला मसाला, चिकन स्टॉक/चिकन शिजवलेले पाणी, कोथिंबीर
कृती :
1) रश्श्याला अजून चवदार बनवण्यासाठी आपण ज्या भांड्यात चिकन मसाला बनवलेला असेल त्याच भांड्यात हा तांबडा रस्सा बनवू शकतो.
2) भांड्यामध्ये सुरुवातीला जितका रस्सा करायचा असेल त्यापेक्षा थोडा चिकन स्टॉक घ्यावा.
3) त्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी टाकून भाजून घेतलेला ओला मसाला थोडा टाकावा आणि मस्तपैकी रस्सा थोडा आटेपर्यंत शिजवून घ्यावा.
4) शेवटी वरून थोडी कोथिंबीर भुरभुरल्यावर तांबडा रस्सा पिण्यासाठी तयार होतो.
स्पे. कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्याची पाककृती?
पांढरा रस्सा बनवण्यासाठी ओले खोबरे, काजू, आले, लसूण आदी घटक वाटण करताना लागतात. तर त्याव्यतिरिक्त चिकन किंवा मटन चा स्टॉक अर्थात चिकन किंवा मटण शिजवलेले पाणी, तूप, उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची, तमालपत्री, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, चक्रफुल, घरगुती गरम मसाला पावडर आणि मीठ आदी घटक लागतात.
कृती :
1) पांढरा रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी बारीक चिरलेले ओले खोबरे काजू, आले-लसूण हे घटक टाकून मिक्सरला बारीक वाटण करून घ्यावे. हे वाटण एका पातळ कापडामध्ये घेऊन त्यातून नारळाचे दूध काढून घ्यावे.
2) पांढऱ्या रश्श्याची फोडणी टाकताना सुरुवातीला भांड्यात थोडे तूप घ्यावे आणि तूप गरम झाल्यावर उभ्या चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या तसेच थोड्या थोड्या प्रमाणात तमालपत्री, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, चक्रफुल हे घटक टाकावेत.
3) मसाले तुपात चांगले भाजले की बाजूला काढून घेतलेले काजू आणि नारळाचे दूध टाकावे.
4) काजू नारळाचे दूध हे कच्चे असल्यामुळे सुरुवातीला तुपात त्यालाउकळी येऊ द्यावी. तर ते चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये चिकन स्टॉक टाकावा.
5) पांढरा रस्सा बनवताना रस्याला उकळी फुटून देऊ नये. अन्यथा दूध फाटल्याप्रमाणे हा रस्ता देखील तसा बनतो. त्यामुळे रस्सा बनवत असताना सतत तो चमच्याने हलवत राहावा.
6) उकळी फुटायच्या आधी चवीनुसार मीठ आणि घरगुती गरम मसाला पावडर थोडीशी वरून टाकावे. थोडा वेळ शिजल्यानंतर पांढरा रस्सा तयार होतो.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 30, 2023 9:23 PM IST

