सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी; विशेष एक्स्प्रेसला जिल्ह्यात 2 थांबे!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी किमान 3 दिवस धावायला हवी, असा प्रस्ताव दिल्याचं रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितलं आहे.
प्रिती निकम, प्रतिनिधी
सांगली : पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसचा आता मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मिरजहून थेट बिकानेरला जाण्यासाठी नवी एक्स्प्रेस उपलब्ध झाली आहे. हा निर्णय सांगलीसह सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनानं पुणे ते बिकानेर एक्स्प्रेस गाडी क्रमांक 20476 सुरू केली. सदर गाडी पूर्वी केवळ पुणे ते बिकानेर अशी धावत होती, आता मात्र ती मिरज जंक्शनपर्यंत जाईल. ही एक्स्प्रेस मिरजेतून दर मंगळवारी दुपारी 2:20 वाजता, सांगलीतून दुपारी 2:40 वाजता, किर्लोस्करवाडी इथून दुपारी 3 वाजता निघेल.
advertisement
मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, सातारा या स्टेशनहून ही गाडी दुसऱ्या दिवशी बिकानेरला रात्री 8:40 वाजता पोहोचेल. मिरज-पुणे हा विशेष दर्जा काढून ही गाडी आता नियमित क्रमांकानं धावतेय. त्यामुळे तिकिटासाठी विशेष शुल्क भरावं लागणार नाहीये. मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी हा थांबा नव्हता. सांगलीतील प्रवाशांनी तसंच नागरिक जागृती मंचानं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर याची दखल रेल्वे प्रशासनानं घेतली. सांगली आणि किर्लोस्करवाडी इथं या एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. हा सांगली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सोयीचा निर्णय ठरला आहे.
advertisement
दरम्यान, आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी किमान 3 दिवस धावायला हवी, असा प्रस्ताव दिल्याचं रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितलं आहे. या प्रस्तावास हिरवा कंदील मिळविण्याच्या प्रतीक्षेत सध्या प्रवासी आहेत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
September 05, 2024 10:27 AM IST