पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दाजीपूर अभयारण्य राहणार बंद
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य हे ठिकाण बऱ्याच जणांना अशा वेळी खुणावत असतं. पण नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे अभयारण्य दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे.
कोल्हापूर : नववर्षाच्या स्वागतासाठी बरेच जण बाहेर कुठेतरी कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणीसोबत शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य हे ठिकाण बऱ्याच जणांना अशा वेळी खुणावत असतं. पण नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे अभयारण्य दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हा पर्यटनाच्या बाबतीत एक महत्त्वाचा तालुका आहे. याच तालुक्यात भारतातील सगळ्यात जुने असे दाजीपूर अभयारण्य आहे. गव्यांबरोबरच अजूनही बऱ्याच वन्यजीव आणि वृक्ष संपदेसाठी हे अभयारण्य खास प्रसिद्ध आहे. त्यामुळे या अभयारण्याला भेट देण्यासाठी बरेचसे पर्यटक येत असतात. मात्र दिनांक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन दिवशी हे अभयारण्य बंद राहणार आहे, अशी माहिती विभागीय वनअधिकारी एस एस पवार (वन्यजीव) व वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली आहे.
advertisement
31 डिसेंबर दिवशी वर्षाअखेरचे सेलिब्रेशन त्याचबरोबर 1 जानेवारीला नववर्षाचे स्वागत यासाठी बाहेरून येऊन हुल्लडबाजी करण्याचे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे वन्यजीव विभागाकडून खबरदारी म्हणून या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्यात येणार आहे. अभयारण्य क्षेत्रात वन्य विभागाकडून गस्त होत असते. पण या दोन दिवसांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेऊन पेट्रोलिंग केले जाणार आहे, अशी माहिती वनक्षेत्रपालाकडून देण्यात आली आहे.
advertisement
...तर कारवाई होणार
या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लास्टिक कचरा करणे किंवा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण गोवा, लोणावळा अशा ठिकाणी फिरायला जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून अनेक उलट सुलट प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अनेक ठिकाणी पर्टकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही फिरायला जाण्याआधी ती जागा पर्यटकांसाठी खुली आहे की नाही हे पडताळणी करून नागरिकांनी फिरायला जावं.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 25, 2024 5:52 PM IST
मराठी बातम्या/Travel/
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दाजीपूर अभयारण्य राहणार बंद