जनशताब्दीपाठोपाठ तेजस एक्स्प्रेसही दादरपर्यंतच धावणार; पुढे जाणार नाही!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावरील क्रमांक 10 ते 13 प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेतलंय. याचा कोकण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम झाला आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे 4 दिवस उरले आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात जाण्यासाठी आतुर आहेत. अशात मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावरील क्रमांक 10 ते 13 प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेतलंय. याचा कोकण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम झाला आहे.
अनेक गाड्यांचा प्रवास आता काही दिवस ठाणे किंवा दादरपर्यंतच असेल. यात जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात आता तेजस एक्प्रेसचा प्रवासही दादर स्थानकापर्यंतच असणार आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी फलाट विस्तारीकरणाचं काम 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्यानं मंगळुरू जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (12134) ही गाडी 30 सप्टेंबरपर्यंत ठाण्यापर्यंतच धावेल. तर, मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी (22120) तेजस एक्स्प्रेस आणि मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी (12052) जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास दादरपर्यंतच असेल.
कोकण रेल्वेनं याबाबत माहिती दिली आहे. पूर्वी या दोन्ही गाड्यांचा प्रवास सीएसएमटी स्थानकातून सुरू होऊन इथंच पूर्ण व्हायचा. परंतु आता मात्र या दोन्ही गाड्या दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना गर्दीतून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2024 10:30 AM IST