Nashik Tourism: पर्यटकांनो लक्ष द्या! नाशिकमध्ये फिरायला जाताय? या पर्यटनस्थळांवर प्रवेश करण्यास निर्बंध
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पावसाचे प्रमाण वाढत असल्याने पावसाळी पर्यटनाच्या हंगामात दुर्घटना घडतात. त्यामुळे कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाकडून भ्रमंतीवर निर्बंध आणले आहेत.
नाशिक: पावसाळा लागला असून अनेक पर्यटक हे फिरण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर निघत आहेत. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने पावसाळी पर्यटनाच्या हंगामात दुर्घटना घडतात. त्यामुळे कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाकडून नाशिक, त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील पर्यटनस्थळांसह गड-किल्ले भ्रमंतीवर निर्बंध आणले आहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दुपारनंतर प्रवेश करण्यास निर्बंध आणले आहेत.
नाशिक वनविभागाच्या नियंत्रणाखालील सर्व पर्यटनस्थळांसह गडकिल्ल्यांवर मद्यप्राशनावर कठोर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, टप्प्याटप्प्याने पर्यटकांना गडांवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा जूनच्या मध्यालाच निसर्गरम्य वातावरण तयार झाल्याने त्यामुळे नागरिकांचे वर्षासहलीचे यंदा बेतदेखील लवकर आखले जाऊ लागले आहे. पावसाळ्याचे अद्याप तीन महिने शिल्लक असून, पावसाळी पर्यटनावर नियंत्रण असावे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून पत्र प्राप्त झाले होते.
advertisement
यानुसार पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर आणि सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांनी त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, बान्हे हरसूल आदी वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांची बैठक घेत काही निर्बंध आखले आहेत. पर्यटनस्थळांवर विशेषतः वीकेंडला प्रभावी गस्त वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. पावसाच्या अंदाजानुसार पर्यटनस्थळांवरील गर्दीचे व्यवस्थापन करावे तसेच याठिकाणी वनमजूर, वनरक्षक आणि वनव्यवस्थापन समितीचे स्वयंसेवकांच्या संख्येत वाढ करण्याची सूचनाही दिली आहे.
advertisement
तसेच त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध असलेला पहिने धबधबा 4 वाजेनंतर तर अंजनेरीवर 2 नंतर कुणालाही जाता येणार नाही. पहिणेबारी गावाच्या शिवारात असलेल्या नेकलेस वॉटरफॉल, दुगारवाडी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी सकाळी 8 दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यानंतर कुणालाही या ठिकाणी जाता येणार नाही. तर हरिहरगड, अंजनेरीगड, ब्रह्मगिरी पर्वतावर पावसाळ्यात दुपारी 2 वाजेनंतर प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
advertisement
सोशल मीडियामुळे गर्दी वाढत असल्याने सेल्फी, रील्स काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी नो सेल्फी झोनचे सूचनाफलक लावण्यात आलेले आहेत. तसेच धोकादायक ठिकाणे निश्चित करत सूचनाफलक लावले आहेत. अशा ठिकाणी सेल्फी आणि रील्स काढणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सहलीचा आनंद लुटताना स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घेत वनविभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jun 24, 2025 8:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Nashik Tourism: पर्यटकांनो लक्ष द्या! नाशिकमध्ये फिरायला जाताय? या पर्यटनस्थळांवर प्रवेश करण्यास निर्बंध










