Monsoon Agriculture Tips: पावसाळ्यात पिकांवर पडतो विविध रोगांचा प्रादुर्भाव, योग्य फवारणी आणि खत व्यवस्थापन कसं कराल? Video
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पावसाळ्यात शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. जास्त ओलावा आणि वारंवार पडणारा पाऊस यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
बीड: पावसाळ्यात शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. जास्त ओलावा आणि वारंवार पडणारा पाऊस यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे उत्पादनात मोठी घट होते आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते. विशेषतः तांबे रोग, करपा, मर रोग आणि मूळकूज हे रोग पावसाळ्यात सर्वाधिक दिसून येतात. म्हणूनच शेतकऱ्यांनी याची योग्य वेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. वेळेत रोग ओळखणे, योग्य औषध फवारणी करणे आणि खत व्यवस्थापन योग्य ठेवणे हेच शेवटी पिकांचे संरक्षण करते आणि उत्पादन वाढवते. याबद्दलच कृषी अभ्यासक सिद्धेश्वर वानखेडे यांनी माहिती दिली आहे.
तांबे रोग म्हणजेच ब्लाइट हा रोग धान्य, टोमॅटो, बटाटा आणि इतर भाजीपाला पिकांवर सहज दिसतो. यामध्ये पानांवर तपकिरी किंवा काळ्या रंगाचे डाग पडतात आणि पाने सुकतात. करपा रोग पानांवर डाग पाडून हळूहळू पानांची वाढ थांबवतो. या रोगांवर उपाय म्हणून मॅन्कोझेब, कॅप्टन, क्लोरोथॅलोनील किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यांसारखी फंगिसाइड्स शेतकरी फवारू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगग्रस्त पाने काढून नष्ट करणे आणि रोग वाढू नये म्हणून इतर झाडांवर फवारणी करणे गरजेचे आहे.
advertisement
मर रोग आणि मूळकूज हे पावसाळ्यातील आणखी एक गंभीर समस्या आहेत. जास्त पाऊस आणि पाण्याचा अयोग्य निचरा यामुळे झाडांच्या मुळांमध्ये बुरशी निर्माण होते आणि झाडे वाळतात. हे टाळण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा चांगला ठेवणे आवश्यक आहे. तसेच झाडांच्या मुळाशी ट्रायकोडर्मा पावडर मिसळून देणे किंवा कार्बेन्डाझिम औषध पाण्यात मिसळून मुळाशी घालणे फायदेशीर ठरते. रोगग्रस्त झाडे वेळीच काढून शेताबाहेर टाकावीत जेणेकरून रोग पसरणार नाही.
advertisement
औषध फवारणी करताना शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. रोग नियंत्रणासाठी 7 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी सकाळच्या वेळेत किंवा पाऊस थांबलेल्या काळात करावी. फंगिसाइड्स योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी. अनावश्यक रासायनिक औषधे टाळावीत आणि फवारणीपूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी फवारणी केली तर रोग नियंत्रण सोपे होते आणि पिकाची गुणवत्ता टिकून राहते.
advertisement
खत व्यवस्थापन ही पिकाच्या चांगल्या उत्पादनाची दुसरी महत्त्वाची कडी आहे. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशा प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. फॉस्फरस आणि पालाश खत हे पेरणीवेळीच द्यावे कारण यामुळे मुळांची वाढ मजबूत होते. नत्र खत म्हणजेच युरिया हे दोन टप्प्यात देणे योग्य ठरते. पहिले रोपे उभे राहिल्यावर आणि दुसरे फुलोरा येण्याच्या वेळी योग्य प्रमाणात खत देऊन पिकांची पोषण क्षमता वाढवता येते. त्यामुळे पावसाळ्यातील रोगांना झाडे सक्षमपणे तोंड देतात आणि शेवटी शेतकऱ्याला दर्जेदार उत्पादन मिळते.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 24, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Monsoon Agriculture Tips: पावसाळ्यात पिकांवर पडतो विविध रोगांचा प्रादुर्भाव, योग्य फवारणी आणि खत व्यवस्थापन कसं कराल? Video









