आजचं हवामान: 3 चक्रीवादळांचा महाराष्ट्राला धोका? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी. महाराष्ट्र, गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट.
मुंबई: पश्चिम बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत दोन ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून चक्रीवादळा सारखी स्थिती सध्या आहे. या दोन्ही कमी दाबाच्या पट्ट्यांकडे हवामान विभागाचे लक्ष असणार आहे. याशिवाय आणखी एक कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रापासून उजव्या बाजूने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्र, गुजरात आणि आसपासच्या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रुपांतरीत होणार नाही ना याकडे हवामान विभागाचं लक्ष आहे.
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी आदेश दिला आहे .आज दिवसभर पालघर मध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. सरकारी आणि खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
वाशिमसह रिसोड,मालेगाव तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने पर्यटकांना याठिकाणी बंदी घातली आहे.
advertisement
पालघर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहतील आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज विजांच्या गडगडाटासह अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 60 ते 80 किमी वेगाने वारे यावेळी वाहण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
धुळे, नंदुरबार, जळगाव इथे 40 किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील. पुणे घाटमाथा ते सातारा घाटमाथ्यावर मात्र अति मुसळधार पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला या जिल्ह्यात हवामान विभागाने 24 तासासाठी यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
संपूर्ण विदर्भात आज वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र 6 जुलैपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढचे 48 तास अति मुसळधार पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाजन करण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 07, 2025 7:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: 3 चक्रीवादळांचा महाराष्ट्राला धोका? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट










