Jogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी किती वर्ष? एवढा उशीर का? प्रवाशांना मिळणार कोणकोणत्या सुविधा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांतून जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पश्चिम रेल्वेवर चौथं रेल्वे टर्मिनस उभारलं जात आहे. सध्या काम सुरू असून कामाला बराच उशीर झाला आहे.
मुंबई: पश्चिम रेल्वेवरील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी एक रेल्वे टर्मिनस उभारलं जाणार आहे. मुंबई सेंट्रल, दादर आणि बांद्रानंतर जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरही आणखी एक टर्मिनल उभारलं जाणार आहे. हे चौथं टर्मिनल उभारलं जात आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ हे चौथं टर्मिनल उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तीन वेळा वेगवेगळी डेडलाईन या टर्मिनलला देण्यात आली आहे. आता चौथ्यांदा तरीही ह्या टर्मिनलचं काम पूर्ण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
टर्मिनल उभारण्यासाठी उशीर का?
खरंतर, पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ चौथं टर्मिनल उभारलं जात आहे. अंधेरीच्या पुढच्या प्रवाशांना प्रवासासाठी दिलासा मिळावा, या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून टर्मिनलचं सुरू असलेलं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. तब्बल तीनवेळा टर्मिनसची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. डिसेंबर 2025, जून 2026 नंतर आता मुंबईकरांना वर्षभर टर्मिनसच्या कामाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. या टर्मिनसच्या डिझाईनमधील बदलांमुळे टर्मिनलमध्ये बरेच बदल केले करण्यात आले आहेत. या अपग्रेडमुळे प्रकल्पाला एक वर्ष विलंब होणार आहे.
advertisement
वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या स्टेशनांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेने ही होणारी गर्दी नव्या टर्मिनसच्या माध्यमाने गर्दी विभागण्याचं काम केले जाणार आहे. “डिझाइनमधील बदल आणि सुधारणांमुळे चौथं टर्मिनल उभारण्यासाठी आम्हाला विलंब झाला. पूर्वी तीन प्लॅटफॉर्म होते. आता आम्ही प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी जुन्या प्लॅटफॉर्मची लांबी आणि रुंदी वाढवली आहे. तिथे आणखी एक प्लॅटफॉर्मची जोडणी आम्ही केलेली आहे. हे चौथं टर्मिनल महत्त्वाच्या टर्मिनलपैकी एक असणार आहे. तिथे वंदे भारत ट्रेनसाठी एक कोचिंग डेपो देखील असेल. येत्या आर्थिक वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे,” अशी प्रतिक्रिया विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी दिली.
advertisement
पुढे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितलं की, “चौथ्या टर्मिनलचं काम 2027 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. पूर्वी टर्मिनसवर मुख्य तीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार होते. त्यापैकी एक होम प्लॅटफॉर्म आणि त्याची प्रत्येकी रूंदी 600 मीटर इतकी असणार होती. आता या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यात आली असून चौथं प्लॅटफॉर्म बांधलं जात आहे. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 4 होम प्लॅटफॉर्म असणार आहे. हे चौथं स्टेशन राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ बांधलं जाणार आहे.” दरम्यान, नवीन टर्मिनल मेट्रो लाईन 7 वरील जोगेश्वरी मेट्रो स्थानकापासून फक्त 250 मीटरच्या अंतरावर असणार आहे. शिवाय, या टर्मिनलच्या बाहेरून कॅब, रिक्षा स्टँड, ओला- उबर पिकअप आणि ड्रॉप पॉईंट्सह पार्किंग परिसरही तयार केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान, जोगेश्वरी टर्मिनलवरून दररोज 24 डब्यांच्या 12 मेल आणि एक्सप्रेस धावतील, अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाणार आहे. दरम्यान, हे टर्मिनस शहरातील एसव्ही रोडच्याही अगदी जवळ असल्यामुळे, रेल्वे, मेट्रो आणि रस्ते या सर्व मार्गांवरून प्रवाशांना अगदी सहजपणे पोहोचता येणार आहे. दरम्यान, राम मंदीर आणि जोगेश्वरी टर्मिनलला जोडण्यासाठी पादचारी पुलाला जोडणारा 6 मीटर रूंदीचा पादचारी पूल बनवला जाणार आहे. तर, रेल्वे स्टेशनवर 12 मीटर रूंदीचा फूट ओव्हर ब्रिज उभारला जाणार आहे. या सुविधांमुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 5:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Jogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी किती वर्ष? एवढा उशीर का? प्रवाशांना मिळणार कोणकोणत्या सुविधा









