महाराष्ट्रातल्या या गावात लागला 3 दिवसांचा 'लॉकडाउन', घरं सोडून गावकरी गावाबाहेर

Last Updated:

काहींनी होडीचा तर काहींनी गाड्यांमध्ये सामान भरत वेशीबाहेर जाण्याची वाट धरली होती. अवघ्या काही क्षणातच संपूर्ण आचरा गाव निर्मनुष्य झाला आणि गावात उरली फक्त शांतता.

+
(आचरे

(आचरे गाव)

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : निनादणाऱ्या चौघड्याचा आवाज भेदत तोफेचा आवाज झाला. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला. बारापाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला. मंदिराच्या पुढील दरवाजालाही कुलूप ठोकले. नौबत दणाणत होती आणि आचरे ग्रामस्थ आपली घरेदारे बंद करून गुरेढोरे, कोंबडी, कुत्र्यांसह आपल्या नियोजित स्थळी वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गुरेढोरही जणू गावपळणीच्या ओढीने मालकासोबत वेशीबाहेर जाण्यासाठी हुंदडत निघाली होती. काहींनी होडीचा तर काहींनी गाड्यांमध्ये सामान भरत वेशीबाहेर जाण्याची वाट धरली होती. अवघ्या काही क्षणातच संपूर्ण आचरा गाव निर्मनुष्य झाला आणि गावात उरली फक्त शांतता.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेलं हे आचरे गाव. या आचरे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरावर सर्व घरादाराची जबाबदारी सोपवत ग्रामस्थांनी वेशीबाहेर रानावनात आपले संसार थाटले आहेत. आता तीन दिवस आणि तीन रात्री केवळ गजबजाट असणार आहे तो वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांमध्ये. मोबाईल युगात हरवलेले संवाद आता पुन्हा जुळणार आहेत. सोमवारी दुपारपासून आचरा गावपळणीला सुरुवात झाली असून चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी रामेश्वराचा कौलप्रसाद घेऊन गाव भरणार आहे. कौल न झाल्यास एक दिवस वाढू शकतो, असे ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे.
advertisement
शहरीकरणाचा साज असलेला आणि सुमारे आठ हजाराच्या आसपास लोकवस्ती असलेले बारा वाड्या आणि आठ महसूली गाव असलेले आचरा गाव आज दुपारनंतर सुरू झालेल्या गावपळणीसाठी वेशीबाहेर विसावले आहे. रविवारपासूनच लांब प्रवासास जाणाऱ्या आचरावासियांनी गाव सोडण्यास सुरुवात केली होती. आज गावपळणी दिवशी सकाळपासूनच आचरा तिठ्यावर गाडीने जाणाऱ्यांची लगबग वाढली होती. जो-तो पळून जाण्यासाठी आतुरला होता.
advertisement
गावाबाहेर ३ दिवस कुठे थांबतात?
आचऱ्यातील बारा वाड्यांतील ग्रामस्थांनी ज्या गावची वेस जवळची तिकडे वस्ती केली आहे. गावपळणीच्या अगोदर दोन दिवसापासूनच ग्रामस्थांनी गुराढोरांना आवश्यक गवत आदी गोष्टी नियोजित निवासस्थानी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली होती. पारवाडी ग्रामस्थांनी पारवाडी खाडी किनारी झोपड्या उभारुन वस्ती केली आहे. वरचीवाडी भागातील काहींनी भगवंतगड रस्त्यालगतच्या माळरानावर राहुट्यात आपले संसार थाटले आहेत. किनारपट्टी भागातील लोकांनी आडबंदर मुणगे भागात, गाउडवाडी, हिर्लेवाडी ग्रामस्थांनी चिंदर-सडेवाडी भागात तीन दिवस, तीन रात्रीसाठी संसार थाटले आहेत. केवळ राहण्यासाठी आसरा एवढाच उद्देश न ठेवता काहींनी कल्पकतेने या राहुट्यांना आकर्षक सजविण्यात आले आहेत.
advertisement
गावकरी गाव का सोडतात?
संपूर्ण गाव निर्मनुष्य झाला तरी श्री देव रामेश्वराची पुजा अर्चा सुरू असल्याने यासाठी गुरव, ब्राह्मण आणि संबंधित मंदिरात येऊन पुन्हा आपल्या निवासस्थानी वेशीबाहेर जातात. दुपारी आणि सायंकाळी वाजविला जाणारा चौघडा नेहमीच्या ठिकाणी न वाजता मंदिरालगतच्या इमारतीत वाजविला जातो.चाकरमानीही सहभागीया गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. आचरे गावत पिढ्यानपिढ्या चाललेल्या गावपळण प्रथेमुळे गाव चार ते पाच वर्षांनी तीन दिवस, तीन रात्रीसाठी निर्मनुष्य होत असल्याने गावातील वातावरण निरोगी होण्यासाठी मदत होत आहे. ध्वनी प्रदूषण नाही, सांडपाणी निचरा होत असल्याने अळी पसरविणाऱ्या डासांचा नाश होतो. यासारख्या अनेक बाबींमुळे आचरा गावपळण ही केवळ प्रथा न होता स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेली मोहीमच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रातल्या या गावात लागला 3 दिवसांचा 'लॉकडाउन', घरं सोडून गावकरी गावाबाहेर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement