बारामतीच्या नगराध्यक्षपदी जय पवारांच्या नावाची चर्चा, अजितदादांनी सस्पेन्स संपवला, म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Baramati NagarPalika Election: बारामती नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षातील नेत्यांची अजित पवार यांनी बैठक घेतली. इच्छुकांशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करून पुढच्या दोन दिवसांत मुलाखती घेऊन उमेदवारांची घोषणा करू, असे अजित पवार यांनी सांगितले.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : पक्षफुटीनंतर बारामती लोकसभा गमावल्यानंतर विधानसभेला पुनरागमन केलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान आहे. बारामती नगरपालिकेत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचे नाव चर्चेत असल्याने पक्षांतर्गत आणि विरोधी गटातही वेगवान घडामोडी घडत आहेत. जय पवारच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याने इच्छुक नेत्यांचा काहीसा हिरमोड झाला. जय पवारांच्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामतीला आले होते. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षातील नेत्यांची त्यांनी आज बैठक घेतली. इच्छुकांशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करून पुढच्या दोन दिवसांत मुलाखती घेऊन उमेदवारांची घोषणा करू, असे अजित पवार यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदी जय पवारांच्या नावाची चर्चा, अजितदादांनी सस्पेन्स संपवला
advertisement
गेल्या दोन आठवड्यांपासून बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक जय पवार लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. समर्थकांकडून समाज माध्यमांवर जय पवार यांच्या नावाचे अभियानही सुरू आहे. बारामतीत जयपर्वाचा प्रारंभ असे म्हणून त्यांचे नाव पुढे केले जात आहे. या सगळ्या चर्चा फेटाळून लावत अजित पवार यांनी तसे काहीही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकारांनी सांगितलेल्या चर्चा बारामतीत होतायेत हे खरे आहे मात्र जय पवार हे नगरपालिका निवडणुकीला उभे राहणार नाही, असे थेट संकेत अजित पवार यांनी दिले.
advertisement
बारामतीत नगराध्यक्ष कोण होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आचार संहिता लागली आहे. सोमवार ते शुक्रवार राज्याचा आढावा घेतला. बारामतीत आज सकाळपासून चाचपणी केली. बारामतीकरांनी मला नेहमी साथ दिली. राजकीय जीवनात काम करताना चढ उतार आले. बारामतीकरांना सांगणार आहे की मी बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करून दाखवेल. काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. उमेदवारी दाखल करायला उद्यापासून सुरुवात होत आहे. बुधवारी मी पुणे शहर आणि ग्रामीण भाग पाहणार आहे. गुरुवारी मी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. एक मेळावा घेऊन माझी मते मी कार्यकर्त्यांसमोर मांडेन, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
बारामतीच्या प्रचाराचे नियोजन कसे?
चिन्ह वाटप केल्यावर प्रचाराला सहा दिवस राहत आहेत. उमेदवारी दाखल करायला सुरुवात झाली की सभा घेण्याचे नियोजन केले जाईल. मतदारांची संख्या फार काही नसते. बारामतीत मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न आम्ही महायुती म्हणून केला आहे. अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत. जेजुरी, सासवड, उरुळी देवाची, दौंड, इंदापूर, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, जुन्नर या निवडणुकांवरही माझे लक्ष असेल, असेही अजित पवार म्हणाले.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2025 4:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीच्या नगराध्यक्षपदी जय पवारांच्या नावाची चर्चा, अजितदादांनी सस्पेन्स संपवला, म्हणाले...


