काही गोष्टी माझ्या कानावर आल्या पण...वडिलांना अंधारात ठेवून पार्थचा व्यवहार? अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
मुंबई : पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या महार वतनाशी संबंधित जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. मात्र या प्रकरणाचा माझ्याशी दुरान्वये देखील संबंध नाही. या प्रकरणाची सगळी माहिती घेऊन मी माध्यमांशी बोलेन पण थेट अजित पवार म्हणून मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी घरातील मुले सज्ञान झाल्यावर आपापल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय करीत असतात. तीन चार महिन्यांपूर्वी काही गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही करायचे नाही, अशा स्पष्ट सूचना त्यावेळी दिल्या होत्या, असे सांगून मला अंधारात ठेवून हा व्यवहार झाल्याचेच अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. आरोप झाल्यानंतर केवळ काही तासांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहेत. सरकारमधील अंतर्गत कुरघोडीचा या प्रकरणाला वास आहे का? अशा चर्चाही सुरू झाल्या. दरम्यान, या सगळ्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबईत अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
advertisement
वडिलांना अंधारात ठेवून पार्थचा व्यवहार?
पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा माझा दुरान्वये देखील संबंध नाही. गेल्या ३५ वर्षांपासून मी राजकीय जीवनात काम करतो. कायद्याने वागणारा, नियमाने वागणारा म्हणून माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. तीन चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या. परंतु असल्या चुकीच्या गोष्टी कुणीही करू नयेत, अशा सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा काय झाले, हे मला माहिती नाही, असे सूचकपणे अजित पवार म्हणाले. एकप्रकारे आपल्याला अंधारात ठेवून हा व्यवहार झाल्याचेच अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला.
advertisement
माझ्या नावाचा वापर करून कुणी काही चुकीचे करत असेल तर माझा पाठिंबा नाही, मुलाला इशारा?
तसेच माझ्या नावाचा वापर करून कुणी काही चुकीचे करत असेल तर माझा पाठिंबा नसेल, असे सांगून त्यांनी पार्थ पवार यांनाही इशारा दिल्याचे बोलले जाते. माझे नाव सांगून कुणी अधिकाऱ्यांना फोन केला, काही सांगण्याचा प्रयत्न केला तर असल्या गोष्टींना माझा पाठिंबा नसेल याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही अजित पवार म्हणाल्याने कुटुंबामध्ये 'गृहकलहाला' सुरुवात झाली आहे का? असेही विचारले जात आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तत्काळ चौकशीच्या आदेशावर अजित पवार म्हणाले...
जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी जरूर चौकशी करून सत्यता पडताळून पाहावी".
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काही गोष्टी माझ्या कानावर आल्या पण...वडिलांना अंधारात ठेवून पार्थचा व्यवहार? अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट


