'किंमत मोजावी लागतेय', अजितदादांचे खडेबोल, छगन भुजबळ म्हणाले, वडाची साल पिंपळाला लावू नका
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी छगन भुजबळांना खडेबोल सुनावल्याचं बोललं जातंय.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झाल्याचं कळतंय. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात २ जूनच्या नव्या जीआरविरोधात छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलीय. तर दुसरीकडे यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेदाची चर्चा छगन भुजबळांसह प्रफुल्ल पटेलांनी मात्र फेटाळून लावलीय.
मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी छगन भुजबळांना खडेबोल सुनावल्याचं बोललं जातंय. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाच्या प्रतिमेबाबत संभ्रम निर्माण करते आणि त्यामुळे पक्षाला त्यांची किंमत मोजावी लागते, अशा शब्दात अजितदादांनी छगन भुजबळांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी जीआर काढला होता. पण भुजबळांनी त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यावरून जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगलाय.
advertisement
अजित पवारांनी त्यांच्या पक्षात साप पोसले आहेत. अजित पवार यांना आम्ही काय म्हणतोय ते आज कळणार नाही. पण आमचे शब्द खरे ठरून तुम्हाला पश्चाताप होईल. भुजबळ हे मराठ्यांचे खरे शत्रू आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील याला काही माहिती आहे का? कोण कधी राजकारणात आले त्याला माहिती नाही, असे वार भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर केले. तसेच मराठा आरक्षणावरही भाष्य करताना भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. पण हिच बाब आता अजित पवारांना खटकलीय. मंगळवारच्या बैठकीत यावरूनच अजितदादांनी भुजबळांची ऐकवल्याचे बोलले जातंय. पण प्रफुल्ल पटेलांनी मात्र या मतभेदाच्या चर्चेचं खंडण केलंय.
advertisement
भुजबळांची ओबीसींबाबतची भूमिका नवी नाही. आमच्या कोणत्याही नेत्यांमध्ये काहीही मतभेद नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे प्रफुल पटेल म्हणाले.
दुसरीकडे, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत. मला बोलायचं असतं तर सरळ सरळ बोलले असते. माध्यमांकडून वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ हे ओबीसींचे महत्त्वाचे नेते आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आतापर्यंत आक्रमक भूमिका घेतलीय. मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पवारांच्या पक्षात असतानाच त्यांनी ओबीसींबाबत भूमिका कायम ठेवलीय. आता अजित पवारांच्या नाराजीनंतर भुजबळ आपल्या भूमिकेला मुरड घातलाहेत की आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवताहेत हे येत्या काळातच समोर येईल. पण दरम्यान भुजबळांच्या भूमिकेमुळे अजित पवारांना तारेवरची करसत करण्याची वेळ आलीय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 8:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'किंमत मोजावी लागतेय', अजितदादांचे खडेबोल, छगन भुजबळ म्हणाले, वडाची साल पिंपळाला लावू नका