Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Akot Nagar Parishad: भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे. भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण
अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत सत्तेसाठी चक्क भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्षांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे. भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.
>> प्रकरण काय?
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर अकोटमध्ये सत्तास्थापनेसाठी कोणाकडेही स्पष्ट बहुमत नव्हते. अशा वेळी भाजपच्या नेतृत्वाखाली 'अकोट नगर विकास मंच' स्थापन करण्यात आला. या मंचाच्या माध्यमातून भाजपने थेट एमआयएम (MIM) सोबत हातमिळवणी केली. या युतीमध्ये भाजप (११ नगरसेवक) आणि एमआयएम (५ नगरसेवक) यांच्यासह इतर काही लहान गट एकत्र आले. कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने भाजपच्या 'हिंदुत्व' आणि 'बटेंगे तो कटेंगे' सारख्या घोषणांवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली.
advertisement
या 'विचित्र' युतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती अमान्य असल्याचे सांगत ती तातडीने तोडण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, एमआयएमनेही सावध पवित्रा घेत या विकास मंचाला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त आहे.
प्रकाश भारसाकळे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली. गावपातळीवरील राजकारणातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावत त्यांनी पंचायतराज समितीचे अध्यक्षपदही भूषवले. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ या चार विधानसभा निवडणुकांत सलग विजय मिळवत आपली मजबूत राजकीय पकड सिद्ध केली.
advertisement
> राणेंच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड करून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. त्याच पार्श्वभूमीवर २००५ मध्ये प्रकाश भारसाकळे यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये त्यांचा राजकीय मुक्काम फार काळ टिकला नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेसने भारसाकळे यांना अकोटमधून उमेदवारी देण्यास नकार दिला. या निर्णयामुळे नाराज झालेल्या भारसाकळेंनी बंडखोरी करत अकोटमधून अपक्ष निवडणूक लढवली.
advertisement
> भाजपकडे वाटचाल आणि विजय
काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भारसाकळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. या निवडणुकीत भारसाकळे यांनी सुमारे ३२ हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आणि भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केले.
> पक्षांतर्गत विरोधाचा सामना
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भारसाकळेंना पक्षांतर्गत तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. अकोटमधीलच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना ‘उपरे’ ठरवत उघड बंडखोरी केली. मागील पाच वर्षांत मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचे आणि निष्क्रिय असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, उमेदवारी मिळाली आणि विजयी झाले. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.
advertisement
प्रकाश भारसाकळे यांनी सत्तेसाठी एमआयएमसोबत आघाडी केल्याने चर्चेत आले. त्यानंतर आता पक्षाकडून कोणती कारवाई केली जातेय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Akot,Akola,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?










