Free Salon Services: समाजासाठी आदर्श! कुष्ठरोगी बांधवांची कटिंग-दाढी करतो मोफत, 11 वर्षांपासून सुरू आहे आकाशचे काम, Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नांदगाव पेठ येथील सलूनचे काम करणारा आकाश कुष्ठ रुग्णांची मनोभावे सेवा करीत आहे. विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथील सर्व बांधवांची कटिंग दाढी तो कोणताही मोबदला न घेता गेले 11 वर्षांपासून करत आहे.
अमरावती: अमरावती शहरातील तपोवन परिसरात विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन ही दाजीसाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी आहे. या ठिकाणी जवळपास अनेक वर्षांपासून कुष्ठ बांधव आणि भगिनींची सेवा केली जात आहे. समाजाने नाकारलेल्या बांधवांना तपोवनमध्ये मायेची वागणूक मिळते. तपोवनमध्ये राहत असलेल्या सर्व बांधव आणि भगिनींना कुणीही हात लावायला बघत नाहीत. त्यांच्यापासून अनेकजण दूर जातात. अशात नांदगाव पेठ येथील सलूनचे काम करणारा आकाश या लोकांची मनोभावे सेवा करत आहे. येथील सर्व बांधवांची कटिंग-दाढी तो कोणताही मोबदला न घेता गेले 11 वर्षांपासून करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सांगतात.
आकाशबाबत बोलताना अध्यक्ष सांगतात...
विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवनचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, दाजीसाहेब या संस्थेत काम करत असताना आमच्याकडे एक बांगड्यांचा व्यवसाय करणारे दादा येत होते. ते नेहमी येऊन आमच्या येथील महिलांच्या थिट्या हातांत बांगड्या भरून देत होते. एकीकडे कुष्ठ बांधवांना कोणी बघत सुद्धा नाही आणि चुडीवालासारखे लोक त्यांची निस्वार्थ सेवा करतात. हा खरंच समाजासाठी आदर्श आहे.
advertisement
जवळपास 300 रुग्णांची दाढी-कटिंग मोफत
लहानपणापासून आमच्याकडे शिकत असलेला आकाश गोलरकर. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे तिन्ही भावंडं आमच्या शाळेतच शिकली. संस्थेने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. आकाशचे बाबा सुद्धा सलूनचा व्यवसाय करत होते. त्यामुळे 10 वी झाल्यानंतर आकाशने सुद्धा नांदगाव पेठ येथे स्वतःचे सलूनचे दुकान सुरू केले. तेव्हापासून तो आमच्या संस्थेत सेवा देत आहे. जवळपास 300 पुरुष रुग्ण आमच्याकडे आहेत. त्या सगळ्यांची दाढी आकाश करून देतो. त्याचबरोबर बाल संगोपन योजनेतील 60 मुले देखील आहेत. त्यांचीही कटिंग आकाश करतो. तो पैशाची अपेक्षा करत नाही. त्याला दिलेले 5 ते 10 रुपये तो घेतो पण, पैशाची मागणी कधीच करत नाही. आकाश समाजासाठी आदर्श आहे. कारण ज्या थिट्या हातांना कोणीही जवळ घेत नाहीत त्यांची सेवा आकाश करत आहे, असे अध्यक्ष सांगतात.
advertisement
गेल्या 11 वर्षांपासून सतत सेवा देणाऱ्या आकाशसोबत लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा तो सांगतो की मी गेले 20 वर्ष या संस्थेशी जुळलो आहे. माझं शिक्षण या संस्थेने पूर्ण केले. त्यानंतर मी नांदगाव पेठ येथे माझा व्यवसाय सुरू केला. या संस्थेबद्दल मला खूप आदर आहे. या बांधवांच्या परिस्थितीशी मी जाणून आहे. यांना कोणीही हात लावत नाहीत, कारण लोकांमध्ये खूप गैरसमज आहे. ही सर्व माझीच लोक असल्याने त्यांची सेवा म्हणून मी गेले 11 वर्षांपासून करत आहे. जवळपास 300 रुग्ण आणि 60 मुले अशा सर्व लोकांची कटिंग-दाढी करतो. आठवड्यातून 3 दिवस या ठिकाणी मी काम करतो. यांनी सहखुशीने दिलेले 5 ते 10 रुपये मी आनंदाने घेतो. माझी पैशाची काही वेगळी मागणी राहत नाही, असे आकाश सांगतो.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
Jul 14, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Free Salon Services: समाजासाठी आदर्श! कुष्ठरोगी बांधवांची कटिंग-दाढी करतो मोफत, 11 वर्षांपासून सुरू आहे आकाशचे काम, Video








