Amravati Mumbai Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत बंद, हवामान बदलाचा फटका!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Amravati Mumbai Flight: अमरावती ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 डिसेंबरपर्यंत या मार्गावरील विमानसेवा बंद राहणार आहे.
अमरावती: राज्यातील हवामानात सतत बदल जाणवत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर अनेक भागांत प्रचंड थंडीचा अनुभव येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाल्याने नागरिक थंडीत कुडकुडत आहेत. विशेषत: सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत दाट धुके पसरत असून वाहतुकीसह विमानसेवेलाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे अमरावती-मुंबई हवाईसेवा दाट धुक्याच्या प्रभावामुळे येत्या 15 डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
15 डिसेंबरनंतर विमान उड्डाणे सुरु होतील की नाही, हे पुन्हा हवामानातील सुधारणा आणि दृश्यमानतेवर अवलंबून राहणार आहे. मात्र सलग 15 दिवस विमानसेवा बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.
यापूर्वीही मागील महिन्याच्या सुरुवातीला दाट धुक्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी अमरावती विमानतळावरील दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने अलायन्स एअरची अमरावती-मुंबई उड्डाणे रद्द करण्यात आली होती. विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल केल्यानंतर धुक्यामुळे सेवा बंद राहण्याची ती पहिलीच वेळ होती. यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडले होते.
advertisement
3 डिसेंबरला विमान रनवेवर न उतरताच परत
3 नोव्हेंबरप्रमाणेच धुक्याचा परिणाम 3 डिसेंबरलाही दिसला. त्या दिवशी सकाळी अमरावतीत दाट धुके असल्यामुळे येणाऱ्या विमानाच्या सुरक्षित लँडिंगची शक्यता नव्हती. त्यामुळे मुंबईहून निघालेले विमान वेळेवर अमरावतीकडे वळले नाही. उड्डाण उशिरा आल्यास पुढील उड्डाणांवर परिणाम होणार असल्याने विमान आकाशातूनच परतीला फिरवण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले. यामुळे प्रवाशांना विमानतळावरून रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
advertisement
प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्याचे संदेश
या निर्णयानंतर आता सेवा 15 डिसेंबरपर्यंत बंद ठेवत असल्याने आधीपासून प्रवासाचे आरक्षण केलेल्या नागरिकांना उड्डाण रद्द झाल्याचे संदेश पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी पर्यायी वाहतुकीकडे वळत आहेत. खासगी वाहने, ट्रेन्स याच्याही बुकिंग वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आणखीनच वाढली आहे.
प्रवाशांच्या आग्रहानुसार वेळेत बदल
26 ऑक्टोबरपासून विमानसेवेच्या वेळेत फेरबदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी मुंबईहून सकाळी 7.30 वाजता विमान उड्डाण घेते आणि 8.50 वाजता अमरावतीत लँड होते. परतीचे उड्डाण सकाळी 9.15 वाजता अमरावतीहून सुटते आणि 10.30 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचते. याआधी ही सेवा संध्याकाळी होती; मात्र ते वेळापत्रक मुंबईत दिवसाचे काम करणाऱ्या प्रवाशांना असुविधाजनक असल्याने वेळ बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
advertisement
हवामान विभागाच्या सूचनांनुसार सेवा बंद
1 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत दाट धुक्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने, त्यानुसार विमानतळ प्रशासनाने सेवा बंद ठेवण्याचे पत्र जारी केले आहे. दृश्यमानता अत्यंत मर्यादित असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अमरावती विमानतळाचे प्रबंधक राजकुमार पटेल यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Dec 05, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati Mumbai Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत बंद, हवामान बदलाचा फटका!










