धनंजय मुंडेंना वाल्मिक अण्णाची आठवण, अंजली दमानियांच्या तळपायाची आग मस्तकात, 'चपलांचे हार घातले पाहिजेत!'
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Anjali Damania on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी खून प्रकरणातील आरोपीची आठवण काढल्यानंतर सामान्यजनांचा संताप झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर धनंजय मुंडे यांना चपलांचे हार घातले पाहिजेत, असे वक्तव्य केले.
मुंबई : गोरगरिबांसाठी काम करणारे जगमित्र कार्यालय रात्रंदिवस सुरू आहे पण तिथे काम करणारा व्यक्ती आपल्यात नाही, अशी खंत व्यक्त करून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण काढली. परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड याला मानणारी मते आपल्यापासून दुरावू नयेत म्हणून धनंजय मुंडे यांनी भावनिक खेळी खेळल्याची चर्चा आहे. दुसरीकडे खुनातील आरोपीची आठवण काढल्यानंतर आणि त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केल्याने सामान्यजनांचा संताप झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर धनंजय मुंडे यांना चपलांचे हार घातले पाहिजेत, असे वक्तव्य केले.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी माध्यमांसहित महाराष्ट्र लढला. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे क्रौर्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. परंतु असे असतानाही एवढ्या क्रूर व्यक्तीची निवडणुकीत आठवण काढली जात असेल तर काय बोलायचे? अशा व्यक्तीला चपलांचा हार घातला पाहिजे, परळीकरांनी त्यांना निवडून दिले तर आयुष्यात परळीत पाय ठेवणार नाही, अशी शपथ अंजली दमानिया यांनी घेतली. त्या न्यूज १८ लोकमतशी बोलत होत्या.
advertisement
परळीकरांनो, आयुष्यात धनंजय मुंडे यांना निवडून देऊ नका
सरपंच देशमुखांना एवढ्या क्रूरपणे संपविणाऱ्या टोळीच्या प्रमुखाची आठवण धनंजय मुंडे यांना येत असेल तर संतापाचा कडेलोट होतो. असली थर्ड क्लास माणसे आपल्या आजूबाजूला आहेत, याचा उबग येतो. असे असतानाही परळीकरांनी त्यांना निवडून दिले तर त्यांना कर्माची फळे भोगावी लागतील. माझे परळीकरांना आवाहन आहे की त्यांनी उभ्या आयुष्यात धनंजय मुंडे यांना निवडून देऊ नये. परळीकरांनी जर धनंजय मुंडे यांना निवडून दिले तर मी कधीच परळीत पाय ठेवणार नाही, असे दमानिया म्हणाल्या.
advertisement
धनंजय मुंडे यांना चपलाचा हार घातला पाहिजे
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कराड टोळीचे क्रौर्य महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांना शासन झाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्राने लढा लढला. परंतु आता परळीकरांनी लढा देण्याची वेळ आहे. अशा क्रूरकर्मा माणसाची आठवण धनंजय मुंडे यांना येत असेल तर त्यांना चपलाचा हार घातला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.
advertisement
निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांचं इमोशनल कार्ड
वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सहकाऱ्यासाठी खुलेपणाने बाजू मांडली नाही, असे अप्रत्यपक्षणे सांगत कराड कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राजकीय क्षेत्रात भरारी घेत असताना राजकीय कट रचून त्यांना अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप कराड कुटुंबियांनी केला. यामुळेच धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण करून नगर परिषद निवडणुकीवेळी भावनिक खेळी खेळल्याचे देखील बोलले जाते. दुसरीकडे वाल्मिक कराड याला मानणारी हजारो मते परळी शहरात आहे. त्यांची मते आपल्या हातून सुटू नयेत, याची काळजी धनंजय मुंडे यांनी घेतल्याचे दिसून येते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडेंना वाल्मिक अण्णाची आठवण, अंजली दमानियांच्या तळपायाची आग मस्तकात, 'चपलांचे हार घातले पाहिजेत!'


