Ashok Kharat : ४९ गुंठे जमीन, १८ रो-हाऊस, अशोक खरातचा ब्लॅक मनी पुण्यात वापरला? सीएची मालमत्ता एसआयटीच्या रडारवर!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case: खरातचा सीए प्रकाश पोफळे याने २०२४ मध्ये कोरेगाव पार्क परिसरात तब्बल ८ रो-हाऊसेस आणि ४९ गुंठे जागा खरेदी केल्याचे पुरावे एसआयटीच्या (SIT) हाती लागले आहेत.
पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा विस्तार आता पुण्यातील सर्वात पॉश समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कपर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खरातचा सीए प्रकाश पोफळे याने २०२४ मध्ये कोरेगाव पार्क परिसरात तब्बल ८ रो-हाऊसेस आणि ४९ गुंठे जागा खरेदी केल्याचे पुरावे एसआयटीच्या (SIT) हाती लागले आहेत. कागदोपत्री या व्यवहाराची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली असली, तरी बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.
सीए मार्फत मनी लाँड्रिंगचा संशय
प्रकाश पोफळे हा खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे नियोजन पाहत होता. सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांना मंत्रतंत्राच्या जाळ्यात ओढून खरातने जे कोट्यवधी रुपये कमावले, तो पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. 'शिवनिका' ट्रस्ट आणि इतर बेनामी व्यवहारांतून जमा झालेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी सीए पोफळेचा वापर झाला का? या दिशेने आता एसआयटी तपास करत आहे. तपासादरम्यान खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या नावावर कोरेगाव पार्क येथील 50 हजार चौ .फू. जागा आणि 9 रो हाउसेस ही 100 कोटींची मालमत्ता आहे. पण कागदोपत्री फक्त ₹19.56 कोटी दाखवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, ट्रस्टची जमीन परवानगीशिवाय हस्तांतरित Sale Deed ऐवजी संशयास्पद Assignment व्यवहार करण्यात आले. 35 वर्षांनंतर अचानक कन्फर्मेशन डीड करण्यात आले.
advertisement
मोठ्या उद्योजकांना खरातनं घातलं गारुड...
भोंदू खरातने केवळ सामान्यांनाच नव्हे, तर मोठ्या उद्योजकांनाही आपल्या जाळ्यात कसे ओढले होते, याचा पुरावाच आता समोर आला आहे. सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांच्या 'असा मी नामकर्ण' या आत्मचरित्रात खरातचे तब्बल १३ पानांचे गुणगान करण्यात आले आहे. २०१२ मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात खरातला 'अद्भुत आणि चमत्कारिक पुरुष' ठरवण्यात आले होते. यावरून खरातने समाजातील प्रतिष्ठित वर्गावर आपले गारूड कसे बसवले होते, हे स्पष्ट होते.
advertisement
बेनामी व्यवहारांचा शोध सुरू
कोरेगाव पार्कच्या लेन नंबर ३ मध्ये, जिथे बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत, तिथे एका सीएने इतकी मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणले? हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसआयटी आता या सर्व व्यवहारांच्या तारखा, बँक खात्यांमधील हालचाली आणि बेनामी गुंतवणुकीचा तपास करत आहे. या प्रकरणात लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 2:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : ४९ गुंठे जमीन, १८ रो-हाऊस, अशोक खरातचा ब्लॅक मनी पुण्यात वापरला? सीएची मालमत्ता एसआयटीच्या रडारवर!








