जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले होमग्राऊंडवर फेल, पॅनेलचा दारूण पराभव, खासदारही पराभूत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Bhandara Bank Election Results: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले विरोधकांना धोबीपछाड देऊन पुनरागमन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु महायुतीच्या समूह शक्तीपुढे नाना पटोले यांचा निभाव लागला नाही.
भंडारा : राज्याचे नेतृत्व करू पाहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना गृहजिल्ह्यातच मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात चर्चेत असलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन नाना पटोले यांच्याविरोधात शक्ती उभी केली. परिणाम शेतकरी परिवर्तन पॅनलला पराभवाचा धक्का बसला. काँग्रेस समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलला १५ पैकी केवळ ४ जागा मिळाल्या असून महायुतीच्या सहकार पॅनेलला ११ जागा मिळाल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ६ जागांचा निकाल लागणार आहे मात्र सहा जागांच्या निकालाआधीच सहकार पॅनल आधीच बहुमतात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी नाना पटोले विजयी झाले. त्यानंतरच्या सहा महिन्यातच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले विरोधकांना धोबीपछाड देऊन पुनरागमन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु महायुतीच्या समूह शक्तीपुढे नाना पटोले यांचा निभाव लागला नाही. खासदार प्रफुल पटेल, आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन अशा महायुतीच्या सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हा बँकेसाठी ताकद लावली होती. या सगळ्यांच्या विरोधात नाना पटोले यांनी एकाकी लढत दिली. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली.
advertisement
जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान काँग्रेस खासदार पराभूत
दूध उत्पादक सहकारी संघ गटात काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा पराभव झाला. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे यांनी खासदार पडोळे यांचा पराभव केला. फुंडे यांच्याविरोधात खुद्द खासदार पडोळे मैदानात उतरल्याने निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती. परंतु लक्षवेधी लढतीत फुंडे यांनी पडोळे यांना पाणी पाजले. सुनील फुंडे यांच्या सहकारातील अनुभवासमोर काँग्रेस कमी पडली. यापूर्वीही झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुनील फुंडे यांनी प्रशांत पडोळे यांचा पराभव केला होता. खासदार प्रशांत पडोळे यांचे वडील आणि दिवंगत नेते यादवराव पडोळे हे नाना पटोले, सुनील फुंडे यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात.
advertisement
नाना पटोले यांचे सहकारी विरोधकांना मॅनेज?
आपण जिल्हा बँकेची निवडणूक लढणार, असे नाना पटोले यांनी जाहीर केले होते. परंतु मधल्या काळातील राजकीय घडामोडींमुळे नाना पटोले यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली. शिवाय भविष्यातील संधी हेरून नाना पटोले यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी विरोधकांना मदत केली, असा आरोपही काँग्रेसमधील काही नेते खासगीत बोलताना करतात.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
July 28, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले होमग्राऊंडवर फेल, पॅनेलचा दारूण पराभव, खासदारही पराभूत