Bhigwan Case: भिगवण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात, आता तरुणाचं काय होणार?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता मोठं वळण मिळालं आहे.
Bhigwan Case: पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता मोठं वळण मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि अपहरणाची तक्रार दाखल झालेली तरुणी अखेर शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. संबंधित तरुणासह ती पोलीस ठाण्यात आली असली, तरी या प्रकरणातील गुंतागुंत अद्याप कायम आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवणमधून बेपत्ता झाल्यानंतर ही तरुणी आणि संबंधित तरुण यांनी मोठा प्रवास केला. ते सुरुवातीला श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवड मार्गे थेट महाबळेश्वरला गेले होते. महाबळेश्वरहून परतल्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस ठाण्यात तरुणीची आई हजर झाली होती, मात्र मुलीने आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत दुपारी साडेबारा वाजता तरुणीला न्यायालयात हजर केले. न्यायालयातील जबाब आणि वैद्यकीय तपासणीनंतर तिची रवानगी सुधारगृहात (पुनर्वसन केंद्र) करण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
तरुणीचे धक्कादायक शपथपत्र
या प्रकरणाला विशेष वळण मिळालं ते तरुणीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळं. या शपथपत्रात तिने काही खळबळजनक दावे केले आहेत. "माझे संबंधित तरुणावर प्रेम असून मी घरच्यांना याची कल्पना दिली होती. घरच्यांचा लग्नाला विरोध होता, म्हणून मी स्वमर्जीने त्याच्यासोबत गेले," असं तिने नमूद केलं आहे. घरच्यांनी दाखल केलेला अपहरणाचा आणि डोळ्यात मिरचीपूड फेकल्याचा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचं तिने या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
advertisement
पोलीस प्रशासनाची भूमिका
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, "या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आम्ही मुलीच्या आई आणि भावाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले आहे. तरुणीनं आपला जबाब न्यायालयासमोर नोंदवला आहे. मात्र, कुटुंबीयांचे आरोप गंभीर असल्याने आम्ही या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करत आहोत."
advertisement
सध्या संबंधित तरुणी सुरक्षित असून तिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर सोबत असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. चौकशीनंतरच पुढील कार्यवाही काय करायची? याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 7:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhigwan Case: भिगवण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात, आता तरुणाचं काय होणार?






