मध्यरात्री भुंकला म्हणून दरवाजा उघडला! मालकासह कुत्राही रक्ताच्या थारोळ्यात, अख्खं गाव हादरलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मूर-कोळंब तिठा येथे रवींद्र सहदेव भांबाडे यांनी बिबट्याशी झुंज देत पाळलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला. गंभीर जखमी भांबाडे रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राजेश जाधव, प्रतिनिधी राजापूर: मध्यरात्रीची वेळ रात्रीच्या किड्यांचा किर्रर्र आवाज आणि भयाण शांतता अख्खं गाव झोपी गेलं होतं. अचानक पाळलेल्या कुत्र्यांला कसलीशी चाहूल लागली आणि तो भुंकायला लागला. काही केल्या त्याचं भुंकणं थांबेना, शेवटी काय परिस्थिती ते पाहण्यासाठी म्हणून घराचा दरवाजा उघडला आणि काळ बनून आलेल्या बिबट्याने झडप घातली. एका क्षणात त्याने कुत्र्याच्या दिशेनं झेप घेतली. राजापूर तालुक्यातील मूर-कोळंब तिठा येथे बिबट्याने थेट घरात घुसून जो धुमाकूळ घातला, तो ऐकून संपूर्ण गाव हादरलं.
आपल्या पाळलेल्या मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी रवींद्र सहदेव भांबाडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्याशी दिलेली झुंज एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही.रवींद्र भांबाडे घरात एकटेच राहतात, मुलं-सुना नातवंड. घराभोवती घनदाट झाडी असल्याने हिंस्त्र प्राण्यांची भीती असतेच, म्हणून त्यांनी सोबतीला आणि रक्षणाला कुत्री पाळली आहेत. रात्रीच्या अंधारात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढल्याने भांबाडे यांनी काळ-वेळ न बघता घराचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने विजेच्या वेगाने थेट घरात झेप घेतली. समोर उभा असलेला मालक आणि पाळलेली कुत्री... बिबट्याने काही क्षणांत एका कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला ओढू लागला.
advertisement
डोळ्यादेखत पाळलेला कुत्रा रक्ताच्या थारोळ्यात जाणार हे पाहून भांबाडे यांच्यात वेगळंच बळ आलं. बिबट्या आपल्या घरात घुसून पाळलेल्या जीवाला संपवतोय हे त्यांना सहन झालं नाही. क्षणाचाही विचार न करता, त्यांनी हातात येईल ती वस्तू उचलली आणि थेट बिबट्यावर धावून गेले. भांबाडे यांनी बिबट्यावर हल्ला चढवताच बिबट्याने कुत्र्याला सोडलं, पण भांबाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
advertisement
बिबट्याने भांबाडे यांच्यावर प्रतिहल्ला करून त्यांना जखमी केलं. पण भांबाडे यांनी निकराने प्रतिकार करत आरडाओरडा सुरू केला. या आवाजाने आणि प्रतिकारामुळे बिबट्याचा धीर खचला आणि त्याने भांबाडे यांना सोडून घराबाहेर जंगलात धूम ठोकली. रक्ताळलेल्या अवस्थेत असलेल्या भांबाडे यांना तातडीने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
आज भांबाडे मृत्यूच्या दारातून परत आले असले, तरी त्यांच्या घराच्या भिंती आजही त्या रात्रीच्या थराराची साक्ष देत आहेत. बिबट्या थेट घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ लागल्याने आता रात्रीच्या वेळी डोळ्याला डोळा लावणंही मूर परिसरातील ग्रामस्थांना कठीण झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 2:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यरात्री भुंकला म्हणून दरवाजा उघडला! मालकासह कुत्राही रक्ताच्या थारोळ्यात, अख्खं गाव हादरलं







