BMC Election : मुंबईत 'त्या' जागा मिळणार पण उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य नाही, शिंदेंसमोर नवा पेच?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election BJP : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचे समोर आले आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचे समोर आले आहे. तब्बल २२७ पैकी २०७ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. मात्र उर्वरित सुमारे २० जागांवर अद्यापही तोडगा न निघाल्याने महायुतीच्या बैठकींमध्ये या जागांवरून चर्चा सुरू आहे. तिढ्यात अडकलेल्या जागांसाठी नवा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीमधील जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी दुपारनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. अंतिम क्षणी सहमती न झाल्यास या जागांसाठी ‘उमेदवार भाजपचा, पण निवडणूक चिन्ह शिवसेना शिंदे गटाचे’ असा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा फॉर्म्युला यापूर्वी विधानसभा निवडणुकीत यशस्वी ठरल्याचा दाखला देत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून त्याचा पुन्हा वापर होण्याचे संकेत दिले जात आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश देऊन त्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती आणि ते निवडूनही आले. त्याचप्रमाणे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांना शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यात आली होती. या प्रयोगामुळे दोन्ही पक्षांना राजकीय फायदा झाल्याचा दावा करण्यात येतो.
advertisement
महापालिकेतही अदलाबदलीचा फॉर्म्युला?
महापालिका निवडणुकीतही चार ते पाच जागांवर असाच तोडगा काढला जाऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवत असल्याने उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा जागा जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. या अदलाबदलीच्या फॉर्म्युल्यामुळे भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्याचे समाधान मिळते, तर शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा अधिक आल्याचे दिसून येईल. मात्र, शिंदे गटातील इच्छुकाचा हिरमोड होणार आहे.
advertisement
दरम्यान, हा प्रयोग केवळ भाजप-शिंदे गट यांच्यापुरताच मर्यादित न राहता त्यांच्या मित्र पक्षांनाही लागू होऊ शकतो. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असून, आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष शिवसेना शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे काही जागांवर या पक्षांमधूनही उमेदवार-चिन्हांची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : मुंबईत 'त्या' जागा मिळणार पण उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य नाही, शिंदेंसमोर नवा पेच?











