BMC Election : दहिसरमध्ये शिंदे गटाचा राडा! प्रचारात घरात घुसण्यावरून वाद, थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण, नेमकं काय घडलं!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Shiv Sena Shinde Clash : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागल्याचे धक्कादायक चित्र दहिसरमध्ये पाहायला मिळाले.
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागल्याचे धक्कादायक चित्र दहिसरमध्ये पाहायला मिळाले. दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारादरम्यान, घरात शिरण्यास विरोध केल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना लाथा-बुक्क्यांनी आणि चक्क पक्षाच्या झेंड्यांच्या काठीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
> नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ जानेवारी) सायंकाळी दहिसर पश्चिम येथील विठ्ठलवाडी सोसायटी परिसरात शिंदे गटाची प्रचार फेरी सुरू होती. यावेळी ८ ते १० कार्यकर्त्यांचा गट एका घरात पत्रके वाटण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी शिरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, संबंधित घरातील व्यक्तींनी घरात येण्यास मज्जाव केला. या किरकोळ कारणावरून कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी घरातील दोन व्यक्तींवर हल्ला चढवला.
advertisement
> मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आक्रमक झालेले कार्यकर्ते संबंधित व्यक्तींना रस्त्यावर ओढत आणून बेदम मारहाण करत आहेत. विशेष म्हणजे, ज्या पक्षाच्या झेंड्याखाली मते मागितली जात आहेत, त्याच झेंड्याच्या दांडक्यांनी या व्यक्तींना झोडपून काढण्यात आले. या मारहाणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
> पोलिसांची कारवाई आणि राजकीय तणाव
advertisement
या घटनेनंतर पीडित व्यक्तींनी एम.एच.बी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मध्यरात्री शिवसेना शिंदे गटाच्या ८ ते १० कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असली, तरी या घटनेमुळे दहिसरमध्ये राजकीय तणाव कमालीचा वाढला आहे.
> नागरिकांचा संतप्त सवाल...
निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या गुंडगिरीमुळे दहिसरमधील सर्वसामान्य मतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. "जर निवडून येण्यापूर्वीच ही अवस्था असेल, तर भविष्यात हे लोक काय करतील?" असा संतप्त सवाल दहिसरमधील स्थानिक नागरिक विचारत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 1:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : दहिसरमध्ये शिंदे गटाचा राडा! प्रचारात घरात घुसण्यावरून वाद, थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण, नेमकं काय घडलं!










