BMC Election Shiv Sena UBT vs Shinde: प्रभादेवीत हायव्होल्टेज लढत! विधानसभेतील पराभवाचा बदला सरवणकर घेणार? वॉर्ड १९४ मध्ये आजी-माजी आमदारांची रंगणार 'ठस्सन'!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Shiv Sena UBT vs Shinde: मुंबईत मराठीबहुल भागातील लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक असली तरी दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. दादर-प्रभादेवीतील वॉर्ड १९४ मध्ये हायव्होल्टेज लढत होणार आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासमोर मोठं आव्हान महायुतीकडून देण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गटामध्ये कोण वरचढ ठरणार, याकडेही लक्ष लागले आहे. मुंबईत मराठीबहुल भागातील लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक असली तरी दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. दादर-प्रभादेवीतील वॉर्ड १९४ मध्ये हायव्होल्टेज लढत होणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता. आजी आमदार महेश सावंत यांनी पुन्हा एकदा कधी काळचे गुरू माजी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. तर, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता सरवणकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.
> आजी-माजी आमदारांची 'ठस्सन'
प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर या ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष उफाळून आला होता. यावेळेस या प्रभागात थेट आजी आणि माजी आमदारांच्या वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष वाढला आहे. २०१७ मध्ये महेश सावंत यांना डावलून सदा सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर याच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यानंतर सावंत यांनी बंडखोरी केली. मात्र, त्यांना अवघ्या २५२ मतांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेना फुटल्यानंतर सदा सरवणकर हे शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर प्रभादेवीत दोन्ही गटात राडा झाला. एका प्रसंगात सरवणकर यांनी पिस्तुलीतून गोळी झाडल्याचाही आरोप झाला. विधानसभा निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा ११०० मतांच्या फरकाने पराभव केला. आता, प्रभादेवीतील १९४ वॉर्डमध्ये कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता लागली आहे.
advertisement
> काय आहे 'पराभवाची परतफेड'चे समीकरण?
काही काळापूर्वी याच भागात झालेल्या वादावादी आणि पोलीस स्टेशनबाहेर झालेल्या राड्यामुळे प्रभादेवी चर्चेत आली होती. सदा सरवणकर आणि महेश सावंत (शिवसेना उबाठा) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे संघर्षाचे वातावरण होते, त्याचा वचपा काढण्यासाठी दोन्ही बाजू सज्ज आहेत.
शिंदे गटासाठी हा वॉर्ड जिंकणे म्हणजे प्रभादेवीत शिंदे गट आणि सदा सरवणकर यांचे वर्चस्व कायम असल्याचे अधोरेखित करणे. तर, ठाकरे गटासाठी ही जागा म्हणजे बालेकिल्ल्यावरील पकड मजबूत असल्याचे दाखवण्याची संधी आहे. महेश सावंत यांना त्यांच्या होमग्राउंडवर पराभवाचा धक्का देत विधानसभेतील निकालाची परतफेड करण्यासाठी सरवणकर पिता-पुत्र उत्सुक आहेत.
advertisement
> निशिकांत शिंदे विरुद्ध समाधान सरवणकर
प्रभाग १९४ मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून निशिकांत शिंदे रिंगणात आहेत, तर शिंदे गटाकडून माजी नगरसेवक समाधान सरवणकर मैदानात उतरले आहेत. त्यांची ही दुसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या महेश सावंत यांचा अवघ्या २५२ मतांनी पराभव केला होता. तर, मनसेचे संतोष धुरी हे तिसऱ्या स्थानी होते. त्यावेळचे बंडखोर महेश सावंत हे ठाकरे गटाचे दादर-माहीमचे आमदार आहेत.
advertisement
विधानसभेत ठाकरे गटाला या वॉर्डमधून मताधिक्य होते. आता, मनसेही सोबत आली आहे. त्यामुळे समाधान सरवणकर यांना मोठं आव्हान आहे. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आाणि त्यानंतर आमदार म्हणून सदा सरवणकर यांनी केलेली कामे ही सरवणकर यांच्यासाठी जमेच्या आहेत. निशिकांत शिंदे हे स्थानिक उमेदवार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे प्रभादेवी भागावर लागलेला गद्दारीचा डाग पुसण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक जोमात आहेत. सरवणकर यांच्या काळात प्रलंबित असलेल्या कामावरूनही त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरेंचे उमेदवार निशिकांत शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत. त्यामुळे सुनिल शिंदे यांच्याकडूनही त्यांनाही मदतीची रसद मिळणार आहे. वरळीला लागून हा भाग असल्याने शिंदेंचा प्रभावदेखील आहे. या वॉर्डचा काही भाग माहीम विधानसभा आणि काही भाग हा वडाळा विधानसभेत येतो. त्यानुसार, आता रणनीती आखली जात आहे.
advertisement
>> २०१७ मधील निवडणुकीचा निकाल काय?
view comments| उमेदवार | मते | पक्ष |
| समाधान सरवणकर | 8623 | शिवसेना |
| महेश सावंत | 8364 | अपक्ष |
| संतोष धुरी | 6684 | मनसे |
| सूर्यकांत धावले | 5112 | भाजप |
| नितीन पाटील | 1495 | काँग्रेस |
| नंदकिशोर पवार | 1069 | राष्ट्रवादी काँग्रेस |
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 12:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Shiv Sena UBT vs Shinde: प्रभादेवीत हायव्होल्टेज लढत! विधानसभेतील पराभवाचा बदला सरवणकर घेणार? वॉर्ड १९४ मध्ये आजी-माजी आमदारांची रंगणार 'ठस्सन'!










