सातासमुद्रापार जाण्याची जिद्द, पण समुद्रच ठरला काळ! 15 दिवसापूर्वी लागली नोकरी, मयुरीच्या निधनाने कुटुंबावर शोककळा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि आपल्या मुलांचे मृतदेह महाराष्ट्रात परत आणण्यात येण्यास सहकार्य करण्यात येणार आहे.
चेन्नई : चेन्नई येथे समुद्रकिनारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर शोककळा पसरवली आहे. चेन्नईतील कॉग्नीझंट या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिप करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इंटर्नशिप करणारे काही तरुण-तरुणी शनिवारी सुट्टीनिमित्त बीचवर फिरायला गेले होते. त्यावेळी ग्रुप सेल्फी घेताना मोठ्या लाटा उसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मूळ भंडारा जिल्ह्यातील वरठी गावची रहिवासी असलेली मयुरी चौधरी (वय अंदाजे २२) हिचा या अपघातात बुडून मृत्यू झाला. पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर ग्रुप सेल्फी घेत असताना अचानक मोठी लाट उसळल्यामुळे २६ जणांपैकी तीन मुलं समुद्रात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच मयुरी चौधरी हिचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला. ही बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे, राज केदारी नावाच्या तरुणाला सुखरूपपणे वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, जळगाव येथील जय पाटील अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मयुरी आणि जय यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने महाराष्ट्रातून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. आपल्या लेकीच्या सुरक्षित भवितव्यासाठी स्वप्ने पाहणाऱ्या मयुरीच्या आई-वडिलांवर हा आघात असह्य ठरत आहे. गावात शोककळा पसरली असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मन हेलावून टाकणारा प्रसंग
advertisement
स्वप्नांच्या भरारीसाठी घरापासून दूर गेलेल्या या तरुण-तरुणींच्या आयुष्यातील हा प्रसंग मन हेलावून टाकणारा आहे. एका क्षणात आनंदाचे क्षण दुःखात बदलू शकतात, याची जाणीव करून देणारी ही घटना असून, समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क करत घेतली माहिती
चेन्नई येथे विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत कार्यावर देखरेख ठेवून आहेत. तामिळनाडू सरकारने तातडीने सर्व मदत बचावकार्यात द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि आपल्या मुलांचे मृतदेह महाराष्ट्रात परत आणण्यात येण्यास सहकार्य करण्यात येणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातासमुद्रापार जाण्याची जिद्द, पण समुद्रच ठरला काळ! 15 दिवसापूर्वी लागली नोकरी, मयुरीच्या निधनाने कुटुंबावर शोककळा







