Mahakumbh 2026: कुंभ मेळ्याआधी मोठा निर्णय, ज्योतिर्लिंग दर्शन होणार सोपं, वेरूळसाठी मास्टर प्लॅन
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kumbh Mela 2026: जागतिक वारसास्थळ आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला वेरूळ परिसर दररोज सरासरी 70 हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ अनुभवतो.
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिर परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे. वेरूळ घाटातून थेट अहिल्यादेवी होळकर शिवालय कुंडाला जोडणाऱ्या 1.65 किलोमीटर लांबीच्या आणि 18 मीटर रुंदीच्या चारपदरी डांबरी बायपास रस्त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जागतिक वारसास्थळ आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला वेरूळ परिसर दररोज सरासरी 70 हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ अनुभवतो. विशेषतः दर सोमवारी घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यात तर दर सोमवारी भाविकांची संख्या सुमारे 5 लाखांपर्यंत पोहोचते. याशिवाय दक्षिण भारतातूनही मोठ्या प्रमाणात भक्त वेरूळ येथे येत असल्याने अरुंद रस्ते आणि अपुऱ्या पार्किंग सुविधांमुळे कन्नड रोडवर गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होते.
advertisement
छत्रपती शिवरायांचं मूळ गाव असलेलं संभाजीनगरमधील हे ठिकाण, ‘ती’ गढी आजही देतेय इतिहासाची साक्ष, Video
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या तीव्र होऊ नये, यासाठी ऑगस्ट 2026 पूर्वी काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नव्या बायपासचा मार्ग महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या हद्दीतून जाणार आहे. यासाठी एमटीडीसीने आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असून त्याबदल्यात शासनाकडून महामंडळाला 6 कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. रस्त्याची अलाइनमेंट निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष बांधकामाला वेग येणार आहे.
advertisement
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
लांबी : 1.65 किलोमीटर
रुंदी : 18 मीटर
प्रकार : चारपदरी डांबरी रस्ता
मार्ग : एमटीडीसी परिसरातून निश्चित अलाइनमेंट
एमटीडीसीला भरपाई : 6 कोटी रुपये
नियुक्त एजन्सी : वंडर कन्स्ट्रक्शन, छत्रपती संभाजीनगर
सार्वजनिक बांधकाम विभाग, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. केंद्रे यांनी सांगितले की, “वेरूळ घाटातील हा 1.65 किलोमीटर लांबीचा व 18 मीटर रुंदीचा चारपदरी रस्ता भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरेल. अलाइनमेंट निश्चित करण्यात आली असून संबंधित एजन्सीला ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” या बायपासमुळे वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 4:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Mahakumbh 2026: कुंभ मेळ्याआधी मोठा निर्णय, ज्योतिर्लिंग दर्शन होणार सोपं, वेरूळसाठी मास्टर प्लॅन







