धक्कादायक वास्तव! शाळेला जायला रस्ता नाही, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, थर्माकोलची बोट अन्...
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सुमारे हजार लोकसंख्या असलेल्या शेवता बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेची शाळा नाही. परिणामी गावातील सुमारे 45 विद्यार्थ्यांना दररोज नदीपलीकडील गावात जातात.
छत्रपती संभाजीनगर: स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही विकासाची पायवाट काही गावांपर्यंत पोहोचलेली नाही. याचे विदारक चित्र फुलंब्री तालुक्यातील शेवता बुद्रुकमध्ये पाहायला मिळते. येथे गिरिजा नदीवर अद्याप पूल नसल्याने शाळेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी चिमुकल्यांना थर्माकोलचा आधार घ्यावा लागतो. पुस्तकांच्या ओझ्याइतकेच जीवाचे ओझे सांभाळत नदी पार करताना आई-वडिलांचे काळीज दररोज पाण्यात विरघळते.
सुमारे हजार लोकसंख्या असलेल्या शेवता बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेची शाळा नाही. परिणामी गावातील सुमारे 45 विद्यार्थ्यांना दररोज नदीपलीकडील शेवता खुर्द येथील शाळेत जावे लागते. मात्र या दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने हा प्रवास सुरक्षित न राहता जीवघेणा ठरतो. यंदा मे महिन्यापासून पावसामुळे गिरिजा नदीला आलेल्या पुरामुळे पात्र अजूनही वाहते आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने अनेक मुलांना घराबाहेरही पडता आले नाही.
advertisement
शिक्षण थांबू नये म्हणून अखेर पालकांनी धाडसी पण धोकादायक मार्ग स्वीकारला—थर्माकोलवर बसवून मुलांना नदी पार करून देण्याचा. काही दिवसांपूर्वी थर्माकोलचा तोल गेल्याने दोन विद्यार्थी थेट नदीत पडले. सुदैवाने ग्रामस्थांनी वेळीच मदत केली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, ही घटना केवळ इशारा ठरली; प्रशासन मात्र अजूनही हालचाल करताना दिसत नाही.
advertisement
ग्रामपंचायतीने पुलासाठी वारंवार ठराव मंजूर करून पाठपुरावा केला आहे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागण्या करण्यात आल्या, तरीही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. कागदोपत्री प्रस्ताव पुढे सरकत असले, तरी नदीच्या प्रवाहासोबत विद्यार्थ्यांचे भविष्य अडकून पडले आहे.
एका बाजूला ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या घोषणा दिल्या जातात; दुसऱ्या बाजूला लहानग्या मुलींसह विद्यार्थी जीव मुठीत धरून नदी पार करतात. हा विरोधाभास केवळ घोषणांचा नव्हे, तर संवेदनशीलतेचाही आहे. शिक्षणाच्या वाटेवरचा हा धोका दूर करण्यासाठी केवळ आश्वासन नव्हे, तर तातडीची कृती आवश्यक आहे.
advertisement
दरम्यान, संबंधित रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून नाबार्ड योजनेअंतर्गत नवीन पुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरीनंतरच पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तोपर्यंत मात्र शेवता बुद्रुकमधील पालक आणि विद्यार्थी दररोज धोक्याशी दोन हात करत शिक्षणाची कास धरून आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
धक्कादायक वास्तव! शाळेला जायला रस्ता नाही, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, थर्माकोलची बोट अन्...










