Dog Attack: अंगाला खाज, पाण्याची भीती; खतरनाक व्हायरसने चिमुकल्याचा मृत्यू, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Dog Attack: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्याच्या काळात शहरात आणि खेड्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना वाढल्या आहेत. नुकतेच एका 3 वर्षीय चिमुकल्याचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाला. शहरातील मोंढा नाका परिसरात ही घटना घडली असून शेख अरमान शेख आमीर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त होतोय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून माणसांवरील हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. मोंढा भागातील जाफर गेट येथील शेख अरमान शेख आमीर या चिमुकल्याचा मंगळवारी सकाळी 11:00 वाजता घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. कुत्रा चावल्याने रेबीज होऊन मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला, तर डोक्यात जखम होती, इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
advertisement
शेख आमीर यांचा 3 वर्षीय मुलगा अरमान याच्या डोक्याला दहा दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्याचा दात लागला होता. ही जखम आई-वडिलांना दिसली नाही. दोन ते तीन दिवसांनी त्याने अंगाला खाज येत असल्याची तक्रार केली. पाणी पाहून घाबरू लागला. कुटुंबीयांनी त्याला शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये नेले. शेवटी त्याची प्रकृती खालावत गेल्याने घाटीत दाखल केले. बाल कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्याने शेवटचा श्वास घेतला.
advertisement
सदर मुलाला 'व्हायरल मेनिंगा इन्फलायटिस'चे निदान झाले होते. यात मेंदूच्या भागाला संसर्ग झाला होता. कुत्रा मुलाच्या डोक्याला चावल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मुलगा रुग्णालयात आला तेव्हा प्रकृती गंभीर होती, असे घाटी रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. अरमानचे वडील शेख आमीर यांनी मुलाला रेबीज झाल्याचा आरोप केला. माझा मुलगा तर परत येणार नाही, किमान दुसऱ्याच्या पोटचा गोळा जाऊ नये. महापालिकेने व्यापक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
advertisement
मागील तीन वर्षांपासून शहरात रेबीजमुळे एकही मृत्यू नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात येतोय. शहर रेबीज फ्री झाल्याचेही म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्षात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज वेगवेगळ्या भागात मोकाट कुत्रे चावल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Dog Attack: अंगाला खाज, पाण्याची भीती; खतरनाक व्हायरसने चिमुकल्याचा मृत्यू, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ