बोटं कापली, मनगट छाटलं, गळा चिरला, संभाजीनगरात गँगवॉरमधून मुजीब डॉनने भावाची केली अमानुष हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Gangwar in Sambhajinagar: पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरात देखील गँगवॉरची घटना घडली आहे. इथं एका ३८ वर्षीय गुन्हेगाराला त्याच्याच दोन भावांनी आणि आत्याच्या मुलाने संपवलं आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यात गँगवॉरच्या विविध घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच आंदेकर टोळीने गँगवॉरमधून आयुष कोमकरची हत्या केली होती. हे हत्याप्रकरण ताजं असताना आता छत्रपती संभाजीनगरात देखील गँगवॉरची घटना घडली आहे. इथं एका ३८ वर्षीय गुन्हेगाराला त्याच्याच दोन भावांनी आणि आत्याच्या मुलाने संपवलं आहे. हल्लेखोरांनी मुलांच्या डोळ्यादेखील वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.
सय्यद इम्रान सय्यद शफिक असं हत्या झालेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. बुधवारी रात्री इम्रान आपल्या दोन मुलांना घेऊन रिक्षाने जात होता. यावेळी आलेल्या हल्लेखोरांनी मुलांना बाजुला करत इम्रानवर सपासप वार केले. शहरातील रेल्वेस्थानक उड्डाण पुलाखाली ही हत्या केली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी रात्री नऊ तासांत मुख्य संशयित मुजीब डॉनसह त्याचा तिसऱ्या क्रमांकाचा सख्खा भाऊ सद्दाम हुसैन मोईनोद्दीन (३४, रा. भावसिंगपुरा) व आतेभाऊ शेख इरफान शेख सुलेमान (रा. बीड बायपास) याला झाल्टा फाटा येथे अटक केली.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास इम्रान आपला १३ वर्षांचा आयान व तीन वर्षाचा आजान यांना घेऊन बाहेर गेला होता. तो घरी जाताना सिल्क मिल कॉलनी परिसरात उड्डाण पुलाखाली एका सुसाट कारने त्याची रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा जणांनी उतरून मुलांना रिक्षातून बाहेर काढलं आणि इम्रानवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. इम्रानने शस्त्र पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याची बोटे कापली, उजव्या हाताचे मनगट छाटले, त्यानंतर शस्त्राने डोके, मानेवर वार करून हत्या केली.
advertisement
हत्येची ही घटना घडताच शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या नऊ तासांत तीन संशयितांना अटक केली. यामध्ये मयताचे दोन सख्खे भाऊ आणि एक आत्याचा मुलगा आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली. दोन हल्लेखोर सद्दाम हुसैन व शेख इरफान कारने शहराबाहेर जात असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना मिळाली. पथकाने धाव घेत झाल्टा फाट्यावर पहाटे ५ वाजता त्यांना पकडले. त्यांच्या कारमध्ये चाकू, तलवार सापडली.
advertisement
मृत इम्रानचे पडेगावच्या सय्यद मुजीब डॉनसोबत जुने वाद होते. त्यातून त्यांच्यात ३१ मे रोजी दोन गटांत हाणामारी झाली. त्यात सय्यद मुजीब, सय्यद सद्दाम यांच्यासह ८ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच घटनेचा बदला म्हणून मुजीब डॉनने आणि इतरांनी इम्रानची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यावरून मुजीब डॉनसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील हत्येचा मुख्य सूत्रधार मुजीब याला पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. पहाटे अटक केलेल्या त्याच्या दोन भावांना न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 03, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बोटं कापली, मनगट छाटलं, गळा चिरला, संभाजीनगरात गँगवॉरमधून मुजीब डॉनने भावाची केली अमानुष हत्या