ढोल-ताशांचा गजर अन् फुलांचा वर्षाव, लग्नाची वरात नव्हे, गुढीपाडव्याला शाळेत अनोखा उत्सव, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Gudi Padwa 2026: विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी शाळेत पाणीपुरीचा स्टॉल उभारण्यात आला होता. तसेच हाताचे रंगीत ठसे उमटवण्यासारखे सर्जनशील उपक्रमही घेण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : गुढीपाडवा हा हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात केली जाते. ढोरेगाव (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन केले. संपूर्ण गावाने एकत्र येत या उपक्रमाला उत्सवाचे रूप दिले. “शिक्षणाचा उत्सव गावभर” या संकल्पनेनुसार प्रत्येक मुलगा-मुलगी शाळेत यावी आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा मुख्य उद्देश होता.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात ग्रामस्थांनी चिमुकल्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी विशेष सन्मान मिळाल्याची भावना निर्माण झाली. शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता. शिक्षकांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले, तर पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
advertisement
विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी शाळेत पाणीपुरीचा स्टॉल उभारण्यात आला होता. तसेच हाताचे रंगीत ठसे उमटवण्यासारखे सर्जनशील उपक्रमही घेण्यात आले. मिरवणुकीनंतर विद्यार्थ्यांचा वर्गात प्रवेश फुलांच्या वर्षावात करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमधील भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या “गुढीपाडवा प्रवेश वाढवा” या अभियानाचीही यावेळी सुरुवात करण्यात आली. प्रत्येक मुलाला शाळेत आणण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
advertisement
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, उपाध्यक्ष अशोक कांबळे, केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर, मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे तसेच सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घेतला. एकूणच, ढोरेगावातील हा प्रवेशोत्सव शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणारा उपक्रम ठरला.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ढोल-ताशांचा गजर अन् फुलांचा वर्षाव, लग्नाची वरात नव्हे, गुढीपाडव्याला शाळेत अनोखा उत्सव, Video







