जात प्रमाणपत्रासाठी अडीच लाख मागितले, एसीबीनं कार्यालयात लावला सापळा, क्लास वन महिला अधिकाऱ्याला अटक
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Thane News : जात प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ठाण्यात क्लास वन महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभागाच्या उपसंचालक (संशोधन) मीनाक्षी उन्हाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जात पडताळणीसाठी अर्ज
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका तक्रारदाराने आपल्या मुलीला डी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी तसेच पत्नीच्या नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने २०२० मध्ये अर्ज केला होता. हा अर्ज ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष ठाणे शहरातील चरई परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता.
फाईल मंजुरीसाठी लाचेची मागणी
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अर्जाची फाईल मंजूर करून देण्यासाठी उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणाची माहिती तक्रारदाराने १२ फेब्रुवारी रोजी एसीबीच्या रायगड विभागाकडे दिली.
advertisement
एसीबीचा सापळा यशस्वी
तक्रारीची पडताळणी एसीबीकडून दुसऱ्याच दिवशी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले आणि पोलिस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाणे येथील कार्यालयात कारवाई केली.
दरम्यान, तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना मीनाक्षी उन्हाळे यांना त्यांच्या केबिनमध्येच रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 9:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जात प्रमाणपत्रासाठी अडीच लाख मागितले, एसीबीनं कार्यालयात लावला सापळा, क्लास वन महिला अधिकाऱ्याला अटक






