BMC Election : 'वंचित'ने काँग्रेसचा गेम केला! मतदानाआधीच १६ जागांवर पराभव? बीएमसी निवडणुकीत मोठी घडामोड...
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election : वंचितसोबतच्या आघाडीने मुंबईतील राजकीय समीकरणावर परिणाम होईल अशी चर्चा होती. मात्र, मतदानापूर्वीच काँग्रेस-वंचितच्या आघाडी १६ जागांवर फटका बसला आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. या युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला ६२ जागा सोडण्यात आल्या. एकीकडे काँग्रेसकडून इतर पक्षांची एक-दोन जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे वंचितला ६२ जागा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. वंचितसोबतच्या आघाडीने मुंबईतील राजकीय समीकरणावर परिणाम होईल अशी चर्चा होती. मात्र, मतदानापूर्वीच काँग्रेस-वंचितच्या आघाडी १६ जागांवर फटका बसला आहे. वंचितने आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवार उभे न केल्याचा फटका आघाडीला बसला आहे.
advertisement
काँग्रेसने मुंबईत वंचितला तब्बल ६२ जागा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मात्र, या ६२ पैकी तब्बल २१ जागा पुन्हा काँग्रेसकडे परत आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. परत आलेल्या २१ जागांपैकी अवघ्या ५ जागांवरच अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आले, तर उर्वरित १६ जागांवर कोणताही अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. जागा वाटपाबाबत अखेरपर्यंत सुरू राहिलेल्या या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement
वंचितला सोडण्यात आलेल्या जागांवरून नाराजी...
मुंबई काँग्रेसकडून थेट ६२ जागा वंचितला देण्याच्या निर्णयावर पक्षांतर्गत आधीपासूनच नाराजी होती. पक्षात इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा मित्रपक्षाला देण्यात आल्याने अनेक पदाधिकारी अस्वस्थ झाले होते. त्यातच काही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आल्याने असंतोष आणखी वाढला. हे नाराजीनाट्य शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नव्या वादाला तोंड फुटलं.
advertisement
कोणत्या जागांवर आघाडीला फटका...
काँग्रेसने वंचितसाठी सोडलेल्या ६, ११, १२, १३, १४, १५, २१, ३०, ४६, ७३, ८०, ८४, ८५, १०८, ११७, १५३, १७७, १८२, १९५, १९८ आणि २०७ या प्रभागांतील जागा अखेर परत करण्यात आल्या. यापैकी १६ जागांवर आघाडीचा कोणताही अधिकृत उमेदवार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काँग्रेस-वंचितचे परस्पर विरोधी दावे...
advertisement
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी वंचित बहुजन आघाडीने या १६ जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना परत केल्याचा दावा वंचितच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. नाराजी आणि योग्य उमेदवारांचा अभाव यामुळेच या जागा परत करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तर, दुसरीकडे मित्रपक्ष अधिकृत उमेदवार देण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. “इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही मतदारसंघ घेण्यात आले. उमेदवार उपलब्ध नव्हते, तर वेळीच काँग्रेसशी चर्चा होणं आवश्यक होतं,” असं मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केलं आहे. आता या १६ जागांबाबत काँग्रेस कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : 'वंचित'ने काँग्रेसचा गेम केला! मतदानाआधीच १६ जागांवर पराभव? बीएमसी निवडणुकीत मोठी घडामोड...









