50 सेकंदाचा थरार, कराडमध्ये लाखोंची रोकड, सोनं अन् 5 किलो चांदी लंपास, पाहा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज येथे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोरच अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी कराड: सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज येथे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोरच अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सोन्या-चांदीचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. या घटनेनं सराफा व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
चोरे रोड परिसरातील ‘श्री वाग्देवी ज्वेलर्स’ चे मालक गणेश यादव (चोरेकर) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला सोनं, चांदी आणि रोकडने भरलेली बॅग लावली होती. त्यांनी दुकानाचं शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता, एका कुलपामध्ये जाणीवपूर्वक ‘मेन’ (Wax) भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कुलूप उघडण्यास त्यांना विलंब झाला.
advertisement
ते कुलूप उघडण्यात व्यस्त असल्याची संधी साधून, दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने क्षणात दुचाकीला अडकवलेली बॅग उचलली आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाला. गणेश यादव यांनी तातडीने आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग केला, मात्र चोरटा वेगाने निसटून जाण्यात यशस्वी झाला.
लाखोंचा ऐवज लंपास
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लंपास केलेल्या बॅगेत सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ किलो चांदीच्या वस्तू होत्या. या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वान पथकाला पाचारण केलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, संशयित दुचाकीस्वाराचा माग काढला जात आहे.
advertisement
रेकी करून डल्ला मारल्याचा संशय
चोरट्याने आधी कुलपामध्ये मेन भरून व्यापाऱ्याचे लक्ष विचलित केले, यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. चोरट्याने दुकानाची आणि मालकाच्या येण्या-जाण्याच्या वेळेची रेकी केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या ५० सेकेंदात ही चोरी झाल्याचं दिसून येत आहे.
Location :
Karad,Satara,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 2:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
50 सेकंदाचा थरार, कराडमध्ये लाखोंची रोकड, सोनं अन् 5 किलो चांदी लंपास, पाहा CCTV VIDEO







