Navratri 2025: नवरात्रीत तुळजाभवानीचं दर्शन महागलं! मंदिर प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकाने गोंधळ
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Navratri 2025: तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील अनेक लोकांची ती कुलदेवता आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: हिंदू धर्मात चैत्र आणि शारदीय नवरात्री उत्सव मोठे सण म्हणून साजऱ्या केल्या जातात. थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीतीला सुरुवात होणार आहे. यावर्षी, 22 सप्टेंबरपासून (सोमवार) शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते. नवरात्रीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते. अशातच आता तुळजापूर देवस्थानातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवरात्रौत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानीचं दर्शन महागलं आहे. मंदिर संस्थानाने नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत दर्शन फी दुप्पट केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील अनेक लोकांची ती कुलदेवता आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. काही भाविक गर्दी टाळण्यासाठी विशेष पास घेऊन दर्शन घेतात. आता मंदिर संस्थानाने या फासची फी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
येत्या 20 सप्टेंबरपासून तुळजापूरमध्ये पास दर्शनासाठी नवे दर होणार आहेत. देणगी दर्शनाचा 500 रुपयांचा पास 1000 रुपयांना तर 200 रुपयांचा पास 300 रुपयांना करण्यात आला आहे. स्पेशल गेस्ट देणगी दर्शनासाठी 200 रुपयांचा पास दिला जात होता. आता या पाससाठी 500 रुपये मोजावे लागणार आहे. अभिषेक पूजेचे दर देखील 300 रुपयांवरून 400 रुपयांपर्यंत वाढवले आहेत.
advertisement
तुळजापूर मंदिर संस्थाने अचानक हा निर्णय घेतला असून एक प्रसिद्धी पत्रक काढून याबाबत माहिती जाहीर केली आहे. दर्शनाचे दर कोणत्या कारणामुळे वाढवले याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मंदिर संस्थानला याबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. भाविकांना मात्र, ऐन नवरात्रीत दर्शनासाठी जास्त खर्च करावा लागणार आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 13, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: नवरात्रीत तुळजाभवानीचं दर्शन महागलं! मंदिर प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकाने गोंधळ