नगरमध्ये रक्तरंजित राडा, दोन गटात तुंबळ हाणामारी, पिनू कापसेंवर चाकुने वार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दोन गटात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दोन गटात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुरेश उर्फ पिनू कापसे (रा. अंतरवाली बुद्रुक, ता. शेवगाव) आणि गणेश कापसे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर बोधेगाव आणि परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
बोधेगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शेवगाव- गेवराई राज्यमार्गालगत पिनू कापसे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गणेश कापसे यांच्यात अचानक वाद निर्माण झाला. पूर्वीपासून सुरू असलेल्या वादातून हा संघर्ष उफाळून आल्याचं सांगितलं जात आहे. काही क्षणांतच वादाचे रूप तीव्र चकमकीत बदलले आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या चकमकीदरम्यान धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीत पिनू कापसे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. तसेच गणेश कापसे यांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. दोघांवर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
advertisement
या घटनेवेळी गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास केला जात आहे. मात्र, अधिकृतरीत्या गोळीबार झाल्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी नागरिकांना दूर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. संबंधितांकडून माहिती घेत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात शेवगाव तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. हल्ल्यामागे जुना वाद, वैयक्तिक वैर की टोळी संघर्ष याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 8:38 AM IST









