डान्सवरून चौफेर टीकेची झोड, अखेर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी, मी पण भाविक भक्त...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
IAS Kirti Kiran Pujara: धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यावर नृत्य केल्याप्रकरणी चौफेर टीका झाली होती. अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : संपूर्ण मराठवाडा ओल्या दुष्काळाने उद्ध्वस्त झालेला असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शारदीय नवरात्रौत्सवात नृत्यावर ठेका धरल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अखेर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
कुणाला वाईट वाटले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो
महाराष्ट्र शासनाने आई तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने ते पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणनू या समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्यावर आहे. नवरात्र महोत्सवात धार्मिक कार्यक्रमाची परंपरा वर्षानुवर्षाची असून मला त्यामुळे सहभागी व्हावे लागते, हे सर्वजण जाणता. पूरस्थितीसारख्या बिकट परिस्थितीत देवीची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी ती मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने पार पाडत असून आई तुळजाभवानीच्या कृपेनेच आपत्तीग्रस्तांच्या मदतीची जबाबदारी तसेच शोध आणि बचाव कार्य पार पाडत आहे.
advertisement
तुळजाभवानी मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने नवरात्र महोत्सवातील घडामोडींकडेही अगदी काळजीपूर्वक लक्ष देणे ही देखील मंदिर संस्थान समितीचा अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे अगदी खूप कमी वेळेसाठी आपण महोत्सव स्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. मंचावरील कलाकारांनी मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने मंचावर येण्याची आग्रहपूर्वक विनंती केली. सभागृहातील सर्व उपस्थितांना त्यांनी तुळजाभवानी देवीच्या स्तवनावर ठेका धरण्याची विनंती केली. आई तुळजाभवानी देवीच्या स्तवनांमध्ये कोणीही तल्लीन होतो. जिल्हाधिकारी असलो तरीही भी एक भाविक भक्त म्हणून कलाकारांना प्रोत्साहन देणे हे माझे काम असून मी ते पार पाडलेले आहे. माझ्या या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला वाईट वाटत असेल तर मी व्यक्तिशः त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले.
advertisement
जिल्हाधिकारी या नात्याने नवरात्र महोत्सवातील कार्यक्रमाला उपस्थित राहिलो
धाराशिव जिल्हा प्रशासनाला सध्या एकाचवेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागत आहेत. एकीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीर्जीचा शारदिय नवरात्र महोत्सव सुरु आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांचे संसार अतिवृष्टी व पुरामुळे उघड्यावर आले आहेत. या परिस्थितीत आई तुळजाभवानी मंदिर संस्थान समितीचा अध्यक्ष म्हणून परंपरेनुसार जिल्हाधिकारी या नात्याने नवरात्र महोत्सवातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे लागत आहे, असेही ते म्हणाले.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 26, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डान्सवरून चौफेर टीकेची झोड, अखेर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी, मी पण भाविक भक्त...