BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे. मात्र, एका डावात शिंदे गट फसला असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे. मात्र, एका डावात शिंदे गट फसला असल्याचे दिसून आले आहे. ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात शिवसेना शिंदे गटात नाराजीनाट्य उफाळून आले आहे. दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ मधून प्रीती पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर पक्षातील इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
प्रभाग १९२ मधून शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर हे इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांना डावलून, मध्यरात्री पक्षात प्रवेश केलेल्या प्रीती पाटणकर यांना थेट उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
advertisement
प्रीती पाटणकर यांच्या उमेदवारीनंतर विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांच्यासह उपविभाग प्रमुख निकेत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर प्रभाग १९२ चे शाखाप्रमुख अभिजित राणे हे देखील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटात स्थानिक पातळीवरील नाराजी तीव्र असल्याचे सांगण्यात येते. प्रभाग १९२ मधील काही पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे दादरमधील शिवसेना शिंदे गटासाठी ही उमेदवारी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली ही अंतर्गत नाराजी शिंदे गटाला कितपत परवडणारी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड










