Skymet alert on Monsoon: मान्सूनवर एल निनोचं सावट, महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? स्कायमेटचा पहिला अंदाज
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
०२६ चा मान्सून सरासरीच्या ९४ टक्के राहील, स्कायमेटचा इशारा, एल निनोमुळे जुलै ते सप्टेंबर पाऊस कमी, मध्य भारत महाराष्ट्रात तुटीची शक्यता
गेल्या वर्षी पावसाला आता तू जा! इतकं म्हणायची वेळ आली होती, नको तेवढा पाऊस झाला. यावेळी मात्र पावसाची ओढ लागणार आहे. यावेळी मान्सूनवर एल निनोचं सावट आहे. त्यामुळे पाऊस आणि पाण्याचा प्रश्न मोठा असणार आहे. शेतीवर संकट ओढवू शकतं. मान्सूनबाबत स्कायमेटनं धोक्याचा इशारा दिला आहे.२०२६ चा मान्सून सरासरीच्या तुलनेत ९४% राहील असा अंदाज आहे. पावसाचा प्रवास अत्यंत अडखळत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः जून महिना तसा स्थिर असला, तरी जुलै ते सप्टेंबर या मुख्य काळात पावसाचा जोर ओसरू शकतो.
काय आहे एल निनोचा अडथळा?
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील स्थिती आता बदलली आहे. गेल्या काही काळापासून अनुकूल असलेली 'ला निना' स्थिती संपून आता तिथे एल निनो सक्रिय होत आहे. नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळातच एल निनो जास्त सक्रिय होईल, ज्याचा थेट परिणाम पावसाच्या वितरणावर होईल. ऑगस्ट-सप्टेंबर अधिक अनिश्चित आणि अनियमित राहण्याची चिन्हं आहेत. या काळात पाऊस कमी होऊ शकतो.
advertisement
पावसाची ओढ लागणार?
प्रशांत महासागरातील एल निनो पावसाला रोखत असला, तरी हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल काहीसा मदतीला धावून येऊ शकतो. सध्या आयओडी तटस्थ किंवा सकारात्मक राहण्याचा अंदाज आहे. जर तो सकारात्मक राहिला, तर एल निनोचा प्रभाव थोडा कमी होऊ शकतो आणि पावसाळ्याची सुरुवात चांगली होऊ शकते. मात्र, दुसऱ्या सत्रात पावसाला ग्रहण लागण्याची भीती नाकारता येत नाही.
advertisement
15 एप्रिलनंतर मान्सूनचं चित्र आणखी स्पष्ट होणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिलनंतर मान्सूनबाबत आणखी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे भारतातील हवामानात खूप मोठे आणि सातत्याने बदल होत आहेत. यावेळी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहील हे खरं असलं तरी काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे की नाही ते 15 एप्रिलनंतर अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
advertisement
स्कायमेटच्या अहवालानुसार, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताला पावसाच्या तुटीचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्राचा विचार करता, मध्य महाराष्ट्रातील शेतीसाठी हा काळ परीक्षेचा ठरू शकतो. पावसाचं वितरण हे विसंगत आणि भेदभाव करणारं असण्याची शक्यता आहे, म्हणजेच कुठं अतिवृष्टी तर कुठं कोरडा दुष्काळ, असं चित्र पाहायला मिळू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 1:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Skymet alert on Monsoon: मान्सूनवर एल निनोचं सावट, महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? स्कायमेटचा पहिला अंदाज








