मिसळ खायला आले अन् राडा करून गेले! कोल्हापूरमध्ये 'फ्री स्टाईल' थरार; चारचाकी गाड्या फोडल्या
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दारासमोर गाड्या लावल्याचा राग आल्याने संबंधित महिलेने त्या गाड्या स्वतः ओढत आणि फरफटत रस्त्याच्या मधोमध आणून पाडल्या.
कोल्हापूर: कोल्हापुरातील गजबजलेल्या राजारामपुरी परिसरातील नवव्या गल्लीत काल रात्री पार्किंगच्या कारणावरून मोठा राडा झाला. घरासमोर गाडी लावल्याच्या रागातून एका महिलेने पर्यटकांच्या गाड्या फरफटत बाजूला केल्या, ज्याचे रूपांतर नंतर दगडफेकीत झाले. या 'फ्री स्टाईल' हाणामारीत केवळ लाथाबुक्क्यांचाच वापर झाला नाही, तर घरांवर दगड आणि काचेच्या बाटल्या भिरकावण्यात आल्या. या घटनेत चारचाकी गाड्यांचे आणि घरांच्या खिडक्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी नवव्या गल्लीत असलेल्या प्रसिद्ध 'वाडा मिसळ' येथे काही ग्राहक मिसळ खाण्यासाठी आले होते. या ग्राहकांनी आपली वाहने परिसरातील एका महिलेच्या घरासमोर पार्क केली होती. आपल्या दारासमोर गाड्या लावल्याचा राग आल्याने संबंधित महिलेने त्या गाड्या स्वतः ओढत आणि फरफटत रस्त्याच्या मधोमध आणून पाडल्या. ग्राहकांनी या प्रकाराचा जाब विचारला असता, दोन्ही बाजूंनी बाचाबाची सुरू झाली.
advertisement
बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत
बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. यावेळी ग्राहकांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या ग्राहकांनी केवळ दगडच नव्हे, तर काचेच्या रिकाम्या बाटल्याही घरांच्या दिशेने भिरकावल्या. या दगडफेकीत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महागड्या चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले असून घरांच्या काचाही फुटल्या आहेत. या राड्यामुळे परिसरातील दुकाने तातडीने बंद करण्यात आली आणि नागरिकांची धावपळ उडाली.
advertisement
राजारापुरी पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भरवस्तीत झालेल्या या दगडफेकीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून, अशा गुंड प्रवृत्तीच्या ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वृद्धाश्रमात वृद्ध महिलेला झाडूने केली मारहाण
advertisement
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई-२ परिसरात एका वृद्धाश्रमात वृद्ध महिलेला झाडूने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाची दखल घेत न्यूज 18 मराठीने संबंधित व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर बोरिवली पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पोलिसांनी रात्रीच साई सीनियर सिटीजन केअरिंग फाउंडेशन या वृद्धाश्रमावर छापा टाकला यावेळी पोलिसांनी पीडित वृद्ध महिलेशी संवाद साधला असून मारहाण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तसेच वृद्धाश्रमाच्या मालकालाही ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 3:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मिसळ खायला आले अन् राडा करून गेले! कोल्हापूरमध्ये 'फ्री स्टाईल' थरार; चारचाकी गाड्या फोडल्या







