Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची तत्परता अन् गडचिरोली जिल्ह्यात महापुराचा धोका टळला
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गडचिरोली जिल्ह्यात महापुराचा धोका टळला आहे.
गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून सततचा पाऊस आणि नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातला शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याला येणारा महापूर टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने तेलंगणाच्या जलसंपदा विभागाशी केलेल्या चर्चेनंतर हा महापुराचा धोका आता टळला आहे.
गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुका हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असून प्राणहिता आणि गोदावरी नदीच्या तीरावर बसलेला तालुका आहे. गोसीखुर्द मधून सोडण्यात आलेले पाणी या ठिकाणी प्राणहिता नदीमध्ये येते. प्राणहिता नदीला पूर असताना गोदावरी नदीला पूर आल्यास गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या काठावर महापूराची परिस्थिती उत्पन्न होते. यावेळी सिरोंचा शहरासह लगतच्या गावांमध्ये पुराचे पाणी जाते. सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे विदर्भातल्या गोसीखुर्द आणि या धरणांसह लगतच्या तेलंगणा मधली धरणही काटोकाठ भरली आहेत. तेलंगणातून अनेकदा पूर्वसूचना न देता या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतो. 1986 मध्ये कडेम धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्याने महापुराचा धोका अनुभवला होता.
advertisement
पालकमंत्र्यांची तत्परता
तेलंगणा सरकारने बांधलेले मेडिगड्डा, येलमपल्ली कडेम, श्रीरामसागर या धरणांचा समावेश आहे. त्या धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीत येते. अशावेळी प्राणहिता नदीमध्ये पूर असल्यास या भागात महापुराची परिस्थिती तयार होते. मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे प्राणहिता नदी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तेलंगणा मधल्या धरणांच्या संदर्भात तेथील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. मात्र, तेलंगणातल्या धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आल्यास सिरोंचा तालुक्याला महापुराचा धोका उद्भवण्याची शक्यता दोन दिवसापासून जाणवत होती. याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महापुराचा धोका टाळण्यासाठी तात्काळ राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्याशी संवाद साधला.
advertisement
तेलंगणा सरकारची हमी
कुठल्याही परिस्थितीत सिरोंचा तालुक्याला महापूर येऊ नये यासाठी तेलंगणाच्या प्रशासनाची तात्काळ संवाद साधण्याच्या सूचना त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला दिल्या. गडचिरोली जिल्ह्याला कुठल्या परिस्थितीत तेलंगणाच्या पाण्यामुळे महापुराचा धोका उद्भवू नये अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी तेलंगणाच्या सिंचन विभागाचे मुख्य सचिव राहुल भोजा यांच्याशी तात्काळ संपर्क साधून तेलंगणातून कुठलीही पूर्व सूचना न देता धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, गडचिरोली जिल्ह्यातली पूर परिस्थिती पाहून येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधूनच पाणी सोडावे अशी चर्चा केली असून, तेलंगणाच्या जलसंपदा विभागानेही पूर्वसूचना न देता पाणी सोडणार नाही अशी हमी दिली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावरती भागाला असलेला महापुराचा धोका टळला आहे.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
Jul 29, 2024 10:49 PM IST
मराठी बातम्या/गडचिरोली/
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची तत्परता अन् गडचिरोली जिल्ह्यात महापुराचा धोका टळला









