अजितदादा ज्येष्ठ नेते, ते पैसे घरी घेऊन जाणार नाहीत, हसन मुश्रीफांचे शिरसाटांना खडे बोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Hasan Mushriff: अर्थ खात्याचा मनमानी कारभार चालल्याच्या शिरसाट यांच्या आरोपावर मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी शिरसाट यांना सुनावले.
कोल्हापूर : निवडणूक काळात मतांसाठी सुरू केलेल्या योजनांचा राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार अधिक झाल्याने इतर खात्यांचा निधी वळता करण्याची दुर्दैवी वेळ राज्य सरकारवर आली आहे. वंचित पीडितांसाठी असलेले सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे खात्यातून निधी वळता करण्याचा पर्याय अर्थखात्याने अवलंबिला आहे. यावर शिवसेनचे नेते, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करीत सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल तर खाते बंद केले तरी चालेल असे सांगत अजित पवार यांना घेरले. अर्थ खात्याचा मनमानी कारभार चालल्याच्या शिरसाट यांच्या आरोपावर मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी शिरसाट यांना सुनावले.
राज्याच्या आर्थिक परिस्थितीची उजळणी करून हसन मुश्रीफ यांनी शिरसाट यांना खडे बोल सुनावले.संजय शिरसाठ हे माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती. एका ज्येष्ठ नेत्याला असं बोलणं योग्य नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
शिरसाट म्हणाले शकुनी अर्थखाते, मुश्रीफांनी सुनावले
अजितदादा काय घराकडे पैसे घेऊन जाणार नाहीत. सगळ्या योजनांना पैसे देताना कसरत होत आहे. पण अजितदादांना शकुनीची उपमा देणे चुकीचे आहे. अजितदादा 8 वेळा निवडून आले आहेत,
advertisement
ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. एवढ्या जेष्ठ नेत्याला असे बोलणे बरोबर नाही, असे मुश्रीफ म्हणाले. अजितदादा काही आकाशातून पैसे आणणार नाहीत. आपण सगळ्यांनी दिलेली आश्वासन पूर्ण करत आहोत. त्यामुळे शिरसाठ यांनी बोलताना विचार करून बोलले पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले.
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल हसन मुश्रीफ म्हणाले...
अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल खंत व्यक्त केली होती. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते असते. मात्र वस्तुस्थिती पाहता आणि पुढचं राजकारण अनुकूल झाल्यावर त्यावर बोलता येईल, असे मुश्रीफ म्हणाले.
advertisement
बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे लोक फोडा, पक्ष रिकामा करा, मुश्रीफ म्हणतात-आमच्यात स्पर्धा
भाजपच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसचे लोक फोडण्याचा सल्ला दिला. यावर मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते फोडण्यात आमच्यात (सत्ताधारी पक्षात) ईर्षा लागलेली आहे. महायुतीला खूप मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना आपली काम होत नाहीत असे वाटत असेल. त्यामुळेही ते देखील सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. याच कारणामुळे बावनकुळे कदाचित बोलले असतील, असे मुश्रीफ म्हणाले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
May 05, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा ज्येष्ठ नेते, ते पैसे घरी घेऊन जाणार नाहीत, हसन मुश्रीफांचे शिरसाटांना खडे बोल