'तुमचा बाप जयराम चाटे येतोय', बीडमध्ये गँगचा थरार! तरुणावर कत्ती आणि रॉडने प्राणघातक हल्ला
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जयराम चाटे एका दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आला असतानाच त्याच्या नावाचा वापर करून हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करू हत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संग्राम चाटे या तरुणाला पाच जणांनी अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यानंतर कत्ती व लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला करताना आरोपींनी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे घेत दहशत निर्माण केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम चाटे हा तरुण काल दुपारी तांबवा परिसरातून जात असताना पाच जणांच्या टोळीने त्याला वाटेतच अडवले. काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली, ज्यामुळे संग्रामला प्रतिकार करणे कठीण झाले. त्यानंतर आरोपींनी कत्ती आणि लोखंडी रॉडने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात संग्राम गंभीररीत्या जखमी झाला असून सध्या त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
धमक्यांमुळे या प्रकरणाला गंभीर वळण
हल्ल्यादरम्यान आरोपींनी दिलेल्या धमक्यांमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. 'तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो, असे म्हणत आरोपींनी संग्रामला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जयराम चाटे हा सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो एका दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आला असतानाच त्याच्या नावाचा वापर करून हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
advertisement
केज तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या हत्येचा प्रयत्न (कलम १०३) आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींशी या हल्लेखोरांचे काय संबंध आहेत आणि हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की वर्चस्ववादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे केज तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
तब्बल 14 महिन्यांनंतर जयराम चाटे याला जेलमधून बाहेर
जयराम चाटे तब्बल 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी बीड जिल्हा कारागृहातून बाहेर आला होता. न्यायालयाच्या परवानगीनंतर तब्बल 14 महिन्यांनंतर जयराम चाटे याला जेलमधून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील केला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 8:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुमचा बाप जयराम चाटे येतोय', बीडमध्ये गँगचा थरार! तरुणावर कत्ती आणि रॉडने प्राणघातक हल्ला






